वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा केला. मात्र, खोके सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा पुनरुच्चार करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खोके सरकार आपल्याकडूनही खोके मागतील या भीतीने उद्योजक महाराष्ट्रात येत नसल्याचा आरोप शनिवारी केला. राज्यात मुख्यमंत्री कोण आहे, हे राज्यातील जनतेला समाजलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली तळेगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.ते म्हणाले, की वेदान्ता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने पुरावा केला. आमचे सरकार असते, तर हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नसता. खोकी घेऊन सत्तेवर आलेले हे ‘खोके सरकार’ आपल्याकडूनही खोके मागतील, या भीतीने उद्योजक महाराष्ट्रात येत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत, जागेचा शासन निर्णय दाखवा ; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिआव्हान

गद्दारांनी आमच्यावर ४० वार केले. आता किमान महाराष्ट्राच्या जनतेवर वार करू नका, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की खोके सरकारने हा प्रकल्प गुजरातला नेला. हे सरकार गद्दारांचे आणि असंविधानिक आहे. ते फार काळ टिकणार नाही.आमचे सरकार असते तर हा प्रकल्प आम्ही जाऊ दिला नसता. मात्र खोके सरकारने सत्तेत येताच दिल्लीस्वरांपुढे पायघड्या घालत लाखो युवकांना बेरोजगार केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत अनेकदा गेले. मात्र, त्यांची ही दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हती, तर स्वत:च्या फायद्यासाठी होती, असा आरोपही ठाकरे यांनी केला.या प्रकल्पासह रोहा आणि छत्रपती संभाजीनगर येथे होणारे प्रकल्पही केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांमध्ये पळविले. या दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रत्येकी ७० ते ८० हजार नागरिकांना रोजगार देण्याची क्षमता होती. वरळी भागात एका सी लिंकचे काम होणार आहे. त्यासाठी चेन्नईत मुलाखती झाल्या. महाराष्ट्रात १७०० जणांच्या मुलाखती झाल्या; पण कामासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळाले नाही. ही महाराष्ट्राची कुचेष्टा आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपनीला याचा जाब विचारत मुलाखती महाराष्ट्रातच घ्याव्या असे ठणकावून सांगितले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध; हैदराबाद विद्यापीठाचे संयुक्त संशोधन

‘गाजर नको, तर रोजगार हवा’
महाराष्ट्राला आश्वासनांचे गाजर नको, रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत आहोत. राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सुमारे दोन लाख रोजगार हिरावले गेले आहेत. ही घटना दुसऱ्या राज्यात घडली असती, तर उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला असता, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray accused the shinde government of asking money from entrepreneurs in maharashtra pune print news amy
First published on: 24-09-2022 at 21:13 IST