खोटी जाहिरात देऊन नोकरीसाठी उत्सुक असलेल्या एका युवतीला रेल्वेत निवड झाल्याचे पत्र पाठवून तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न याच युवतीच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणात रेल्वेचा लोगो आणि लेटरहेडचा वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, अशा प्रकारे इतर अनेक जणांनी नोकरीसाठी अर्ज केलेले असल्याने इतरांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
पूजा मगर (वय १९, रा. रहाटणी) असे या युवतीचे नाव आहे. रेल्वेच्या ७३५ जागा रिक्त असल्याची जाहिरात २९ मे रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यात संपर्कासाठी ०८१३००२६७७८ हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार, त्या जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार पूजाने या क्रमांकावर संपर्क साधून अर्ज केला. त्यानंतर दोन दिवसांत तिला पत्र आले. त्या पत्रावर रेल्वे खात्याचा लोगो होता आणि तिची रेल्वेसाठी निवड झाल्याचे नियुक्तीपत्रही होते. या पत्रात तिला ४५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जावे लागणार असल्याचा उल्लेख होता. त्यासाठी साडेबारा हजार रुपये भरण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्याकरिता एका बँकेच्या ठरावीक खाते क्रमांकावर ते पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. पूजा हिला या गोष्टीची शंका आली. त्यामुळे तिने रेल्वे स्थानक तसेच काही जाणकारांकडे या भरतीबाबत चौकशी केली. तेव्हा अशाप्रकारे कोणतीही भरती नसल्याचे तिला समजले. त्यामुळे ती सावध झाली आणि पुढचा व्यवहार केला नाही. या प्रकरणी फसवणुकीचा प्रयत्न झाल्याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली नाही.
या संदर्भात पूजाने सांगितले, की जवळपास २०० जणांनी तरी पैसे भरले असावेत. या संपूर्ण प्रकियेत काहीशी गडबड असल्याचा संशय आला. पैसे भरण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने मी सुदैवी ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2015 रोजी प्रकाशित
रेल्वेत नोकरी मिळाल्याचे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न युवतीच्या सतर्कतेमुळे उघड
एका युवतीला रेल्वेत निवड झाल्याचे पत्र पाठवून तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न याच युवतीच्या सतर्कतेमुळे फसला.

First published on: 12-06-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertisement railway job logo letterhead