पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून दुर्घटना झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील विविध भागात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर वाहतुकीच्या साेईसाठी ३२ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. यामधील दापाेडीतील हॅरिस पुलाला १३०, चिंचवड येथील चिंचवड रेल्वे पुलाला ४७, तर पिंपरीतील इंदिरा गांधी पुलाला ४२ वर्षे झाली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसले आहे. शहराच्या चहूबाजूंना ये-जा करण्यासाठी तसेच, सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली. २००४ मध्ये महापालिकेने निगडी, टिळक चाैकातील कै. महापाैर मधुकर पवळे हा पहिला उड्डाणपूल उभारला.
त्यानंतर शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधले आहेत. तसेच रेल्वे मार्ग, चौक आणि महामार्गावर उड्डाणपूल उभारले आहेत. पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे येताना दापोडीत हॅरिस पूल इंग्रजांच्या काळात म्हणजे १८९५ मध्ये, तर त्याच ठिकाणी समांतर पूल पुणे महापालिकेने १९८७ मध्ये उभारला हाेता. वाहतुकीचा ताण वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१९ मध्ये समांतर पूल उभारला. चिंचवडमधील रेल्वे पूल १९७८, तर पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल १९८३ मध्ये उभारला आहे. हॅरिस ब्रिज, पिंपरी आणि चिंचवड अशा तिन्ही पुलांचे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. ऑडिटनुसार पुलांची दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाकडे जाणारा पवना नदीवरील पुलाला अनेक वर्षे झाली असून, हा पूल धाेकादायक झाला आहे. दापाेडी, आदर्शनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ जुना साकव पूल आहे. हा पूल रहदारीसाठी २००८ मध्ये बंद करण्यात आला असून, कायमचा बंद करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील पूल, उड्डाणपूल
नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील दुमजली उड्डाणपूल, भोसरी, चिंचवडगाव, थेरगावातील डांगे चौक येथील उड्डाणपूल हे शहरातील मोठे पूल आहेत. पिंपरीगाव-पिंपळे सौदागर (दोन पूल), दापोडी-फुगेवाडी, दापोडी-बोपोडी, दापोडी-सांगवी, बोपखेल-खडकी, सांगवी-स्पायसर महाविद्यालय, सांगवी-पुणे विद्यापीठ, निगडीतील टिळक चौक, भोसरी, स्पाईन रस्ता, चिंचवड गावातील मोरया मंदिराशेजारी, चिंचवडगाव ते बिर्ला रुग्णालय, चिंचवड स्टेशन (दोन पूल), चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाण पूल, बिजलीनगर, थेरगावातील डांगे चौक, वाकड-हिंजवडी, निगडी-रावेत, सांगवी फाटा-औंध, तळवडे-निघोजे, कासारवाडी-पिंपळे गुरव, दापोडी-पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर-जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, कुदळवाडी उड्डाण पूल असे ३२ पूल, उड्डाणपूल शहरात आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म, चिंचवडगावातील फुलपाखरू, पिंपळे निलख-बाणेर येथील पुलाचे काम सुरू आहे.
शहरात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर ३२ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल आहेत. यामधील बहुतांशी पुलाचे आयुर्मान २० वर्षांच्या आतील आहे. चार पुलांना ३० वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. तीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-महापालिका