पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लहान-मोठे पूल, साकव, रस्ते, इमारती, वाड्यांचे स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यासह जाहिरात फलकांची तपासणी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा डुडी यांनी आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी हा आदेश दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
‘आपत्ती व्यवस्थानाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक, तसेच अतिधोकादायक जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलक, रेल्वे पुलांची येत्या सात दिवसांत बांधकाम तपासणी (स्ट्रॅक्चरल ऑडिट) करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा. या लेखापरीक्षणात धोकादायक म्हणून निश्चित केलेले पूल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलक काढून घ्यावेत. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून जागानिश्चिती करावी,’ असे डुडी यांनी सांगितले.
‘पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या मात्र पाणी साचणाऱ्या रस्त्यावर अडथळे उभारावेत, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना धोकादायक पर्यटनस्थळी जाण्यास प्रतिबंधित करावे, तसेच पर्यटनस्थळी आणि रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावावेत, या ठिकाणी वन व्यवस्थापन समितीची मदत घ्यावी, तसेच आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. धोकादायक ठिकाणी मॉक ड्रील आयोजित करावे. तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावेत,’ अशा सूचनाही डुडी यांनी केल्या.