पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन शुक्रवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने निरोप दिला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडीत दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. शुक्रवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. पालखीने पिंपरीतील एच.ए. कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा घेतला. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला. पालखी सोहळ्याने दुसरा विसावा कासारवाडीत घेतला. तर, दुपारची विश्रांती दापोडीत घेतली. त्यानंतर पालखी सोहळ्याने हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडीत प्रवेश केला.

ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सकाळी आगमन झाले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दिघी मॅगझीन चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त सचिन पवार, राजेश आगळे, अण्णा बोदडे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मानाच्या दिंड्यांना कापडी पिशवी, देशी वृक्षांच्या बिया, तुळशीचे रोप, संपर्क माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार पेटी देऊन सन्मान करण्यात आला. आयुक्त सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत पालखीत सहभागी झाले. उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. आषाढीवारी निमित्त वृक्षारोपण, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडीतील भाविक थोरल्या पादुकापर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी आले होते. सकाळची विश्रांती घेतल्यानंतर पालखीने पुण्याकडे मार्गक्रमण केले. दुपारी बाराच्या सुमारास पालखी सोहळा पुणे शहराच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला. भक्तिमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला.