पुणे : सोयाबीननंतर आता मुगालाही कवडीमोल भाव मिळत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव ८ हजार ६८२ रुपये प्रति क्विंटल आहे. पण, शेतकऱ्यांना सध्या जेमतेम सात हजार रुपये दर मिळत आहे. खरिपातील मुगाची काढणी नुकतीच सुरू झाली आहे. बाजारात आवक वाढताच दरात आणखी घसरणीची भीती आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील नवे मूग बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी (२४ ऑगस्ट) सोलापूर, जालना, अकोला, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि वाशीम बाजार समित्यांमध्ये खरिपातील नवे मूग दाखल झाले आहे. हंगाम नुकताच सुरू झाल्यामुळे आवक कमी आहे. मुगाला ६ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपये कमी आहे.

हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?

खरीप हंगामात राज्यात सरासरी ३ लाख ९३ हजार ९५७ हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. मागील वर्षी जून महिन्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला नव्हता. त्यामुळे लागवडीत घट होऊन १ लाख ७४ हजार ४५४ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा जूनच्या मध्यापासून मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे २ लाख ३२ हजार ४४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाचे पीक अडीच महिन्यात काढणीला येते. त्यामुळे नवे मूग बाजारात येऊ लागले आहे. मुगाच्या काढणीला अद्याप वेग आला नाही. पाऊस उघडीप देताच काढणीला जोर येईल. बाजारात मोठ्या प्रमाणावर मूग येताच दरात आणखी पडझड होण्याची भीती आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटण्यास मज्जाव

‘केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. हमीभावासह विविध शेती प्रश्नांवर त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, प्रशासन आणि भाजप नेत्यांनी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. सत्ताधारी आमचे ऐकूनच घेत नाहीत, तिथे आम्हाला न्याय कसा मिळणार,’ असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – ५०० ते ६०० टन ऊस असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्पादन खर्च वाढला, भाव कमी मिळाला

खरीप हंगामातील नव्या सोयाबीन, मूग, उडदाची बाजारात आवक सुरू झाली आहे. पण, सर्वच शेतीमालांची विक्री हमीभावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने होत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे, दुसरीकडे हमीभावही मिळत नाही, अशी अवस्था आहे. केंद्राने जाहीर केलेला हमीभाव किमान दर असतो, कमाल नाही. पण, शेतीमालाला किमान दरही मिळत नसल्याची स्थिती आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.