पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अत्याधुनिक साधनांचा वापर करून पुणे जिल्ह्याचा समग्र पर्यटन आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, गवताळ प्रदेश सफारी यांचा समावेश केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ निर्मितीबाबत बैठक झाली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक उपसंचालक शमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, श्वेता कुऱ्हाडे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमूल्य कार्याची ओळख करून देणारे गडकिल्ले जिल्ह्यात आहेत. या गडकिल्ल्यांकडे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने कामे करावीत. तसेच महसुलात वाढ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपरंपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य, आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करून पयर्टन स्थळांची निवड करण्यात यावी. या स्थळावर स्वच्छता, प्रदूषण न होणे, पर्यावरण ऱ्हास टाळण्यावर भर द्यावा. पर्यटनस्थळांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासोबत पर्यटकांना रस्ते, दिशादर्शक फलके, भोजनालय, निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, दरपत्रके, वैद्यकीय सुविधा या बाबत सर्वंकष माहिती ऑनलाइन स्वरुपात मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नामांकित पर्यटन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय प्रचारासाठी पर्यटन महोत्सव

येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आधी स्थळ निश्चिती करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक, पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध सामाजिक संस्थांना निमंत्रित करावे. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचारासाठी पुणे जिल्हा समग्र आराखडा महत्त्वाचा ठरणार असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना डुडी यांनी दिल्या.