पुणे : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शहरातील गजबजलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रस्ता) कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशिअल इंटलिजन्स) आधारित कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते बुधवारी कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले.
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे प्रभारी उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पोलीस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी या वेळी उपस्थित होते. गोखले रस्त्यावर एखाद्या वाहनचालकाने चुकीच्या पद्धतीने वाहन लावल्यास कॅमेरे टिपणार आहेत. एक मिनिटात वाहन न हलविल्यास संबंधित वाहनचालकाला एका मिनिटात दंडाचा रक्कमेचा संदेश येईल. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहन लावल्यास एआय कॅमेऱ्यांद्वारे संबंधित वाहनचालकावर त्वरीत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
फर्ग्युसन रस्ता कायम गजबलेला असतो. दुहेरी पार्किंग, सम- विषम दिनांक न पाहता वाहने लावल्यामुळे काेंडीत भर पडते. वाहतूक संथगतीने सुरू असते. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार घडतात. ‘एआय’ प्रणालीमुळे चालकाचे वाहन क्रमांक, नियमभंग केल्याचे छायाचित्र त्वरीत टिपले जाईल. वाहनचालक रस्त्यावर वाहने लावून उपाहारगृहात जातात. या कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
विमानतळ रस्त्यावर ‘एआय’ कॅमेरे
लोहगाव विमानतळ परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या भागात बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत आहे. या रस्त्यावरही एआय कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विमानतळ प्रशासनाशी चर्चा केली आहे.
‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली नेमकी काय ?
– गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत कॅमेरे
– बेशिस्त वाहनचालकांवर काही क्षणात कारवाई
– बेशिस्त वाहनचालकांना वाहन बाजूला नेण्यासाठी एक मिनिटांचा अवधी
– वाहन न हलविल्यास ऑनलाइन दंडात्मक (ई-चलन) कारवाई
– वाहतूक सुरळीत होण्यास मदत
– डिजिटल फलकावर बेशिस्त वाहनचालकाचा क्रमांक
‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहेत. बेशिस्तांवरही या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करता येणार आहे. भविष्यात शहराच्या अन्य भागात अशा प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. हे रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करणार आहोत.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त