पुणे : ‘शुद्ध देशी गोवंशाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण धोरण आखण्यात आले आहे. या जैव तंत्रज्ञानाला आणखी विकसित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे देशी गायींचा सांभाळ आणि विकास उत्कृष्टपणे साधता येणार आहे,’ अशी माहिती गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
‘राज्यातील एकही शुद्ध देशी गोवंश पैदास धोरणातून यामुळे दुर्लक्षित राहणार नाही, शुद्ध गोवंशाची अनुवंशिकता वाढ, अवर्गीकृत गोवंश शुद्ध गोवंशात परावर्तीकरण, कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपण, लिंगवर्धित रेतमात्रांचा वापर, गोवंशाची शुद्धता यामध्ये सुलभता येईल,’ असे मुंदडा म्हणाले.
‘राज्यात आज (२२ जुलै) देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनानिमित्त गोसेवा आयोगाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत,’ याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुंदडा बोलत होते. आयोगाचे सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य संजय भोसले, सदस्य सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक यावेळी उपस्थित होते.
मुंदडा म्हणाले, ‘राज्यातील देशी गोवंश आपल्या अंगीकृत गुणांमुळे जगात नावाजलेले आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानयुक्त विज्ञान युगात शास्त्रीय घोरणे राज्यातील देशी गोवंश संवर्धनाचे विचार अधिक दृढपणे रुजले जावे, यासाठीच शासनाने शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यात येणार आहे. राज्यात नोंदणीकृत ९६० गोशाळांची नोंदणी झाली असून, सव्वा दोन लाख गोवंश शेतकऱ्यांच्या दारात आहेत. या शुद्ध देशी गोवंशाच्या जतन, प्रजनन आणि समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्य घेण्यात येणार असल्याचे धोरण आखण्यात आले आहे.’
डाॅ. मार्कंडेय म्हणाले, ‘खिलार, देवणी, लाल कंघार, डांगी आणि गवळवू या शुद्ध गोवंशाच्या पाच जाती आहेत. यामध्ये केंद्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे गेल्या काही वर्षात कोकण, कपिला आणि कठाणी या गोवंशाची भर पडली आहे. राज्यातील शुद्ध देशी गोवंश संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपात समृद्ध होण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि प्रामुख्याने महाराष्ट्र गोसेवा आयोग सरसावला आहे.