पुणे : वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. अशा परिस्थितीत हवेच्या गुणवत्तेचा निर्माण होणाऱ्या पुढील तीन दिवसांचा अंदाज आणि त्यावर आधारित उपाययोजना करण्यासाठी ‘एअरवाइज’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. दिल्ली, जयपूर या शहरांमध्ये सध्या ही प्रणाली वापरण्यात येत असून, अशा प्रकारची ही जगातील एकमेव प्रणाली आहे. येत्या काळात या प्रणालीमध्ये पुणे, मुंबई या शहरांचाही समावेश करण्यात येणार आहे.

पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) एअर क्वालिटी वॉर्निंग अँड इंटिग्रेटेड डिसिजन सपोर्ट सिस्टिम फॉर एमिशन (एअरवाइज) ही प्रणाली विकसित केली आहे. पुणे दौऱ्यावर आलेले पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांनी या प्रणालीचा आढावा घेतला. काही वर्षांपूर्वी आयआयटीएमनेच ‘सफर’ ही प्रणाली विकसित केली होती. मात्र, त्या पुढे जाऊन आता ‘एअरवाइज’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यात औद्योगिक, वाहतूक अशा वेगवेगळ्या घटकांकडून होणारे प्रदूषण विचारात घेऊन अंदाज, उपाययोजना सुचवल्या जातात.

या प्रणालीबाबत आयआयटीएममधील शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे म्हणाले, जगात हवेच्या गुणवत्तेचा अंदाज देणाऱ्या किंवा प्रदूषणकारी स्रोतांची माहिती देणारी प्रणाली आहे. मात्र, एकाच अंदाज प्रारूपद्वारे पुढील तीन दिवसांचा हवा गुणवत्तेचा अंदाज, त्यात कोणते घटक कारणीभूत आहेत, याची माहिती ‘एअरवाइज’ ही प्रणाली देते. अशा प्रकारची ही जगातील एकमेव प्रणाली आहे. हवेची गुणवत्ता अतिधोकादायक पातळीवर असल्यास दिल्लीसारख्या शहरातील प्रदूषणाच्या अंदाजावर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजनाही केल्या जातात. त्यामुळे हवेची गुणवत्ता पूर्ववत होण्यास मदत होते.

येत्या काळात पुणे, मुंबई, अलवर, भिवनी, अहमदाबाद अशा काही शहरांचा या प्रणालीमध्ये समावेश करण्याचे नियोजन आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये मुंबईचा किती वाटा आहे किंवा मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये पुण्याचा किती वाटा आहे हेही समजू शकणार आहे. तसेच पुण्याच्या आजुबाजूच्या जिल्ह्यांच्या बाबतीतही हे समजू शकणार आहे. या प्रणालीसाठी प्रारूप विकसित करण्यात आले आहे. हवेच्या गुणवत्तेचा नेमका अंदाज उत्सर्जनाच्या तपशीलाच्या आधारे देता येतो, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरात विस्तार

‘मिशन मौसम’अंतर्गत देशभरात या प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्यात १४७ शहरांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. घुडे यांनी दिली.