पिंपरी- चिंचवड : अलीकडे महाराष्ट्रात होणाऱ्या हल्ल्याच्या घटना महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहूंचा आहे. अशा घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुका स्वबळावर की महायुती म्हणून लढणावर यावर देखील अजित पवारांनी मत व्यक्त केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज देखील अजित पवार पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
अजित पवार यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांवर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात हल्ल्यांच्या घटना न शोभणाऱ्या आहेत. हा महाराष्ट्र शाहू, फुलेंचा आहे.” काल नाशिक येथे पत्रकारांवर भ्याड हल्ला झाला. याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असले हल्ले सहन केले जाणार नाहीत. कुणीही हातात कायदा घेऊ नये. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारची कमिटी काम करत आहे. जीआर ही काढलेला आहे. काही जणांच याबाबत वेगळं मत आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देता येईल का हे बघत आहोत. अस ही अजित पवार म्हणाले.
आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाष्य केले आहे. “आम्ही महायुती म्हणून विधानसभा, लोकसभा निवडणूका लढलो आहोत. आगामी महानगर पालिका निवडणुकीत त्या – त्या ठिकाणची परिस्थिती बघून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणार आहोत.” अस अजित पवारांनी सांगितलं आहे.