पिंपरी : ‘जागा वारंवार कशासाठी घेता हे म्हणणे फार सोपे आहे. मग, विकास करायचा कोठे, हवेत सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे जागेचे भूसंपादन करावेच लागणार,’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. चाकणमध्ये चारपदरी उड्डापूल करण्यास मान्यता दिली आहे असेही त्यांनी सांगितले.
‘रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वर्तुळाकर मार्ग, भुयारी मार्ग, कचऱ्याची विल्हेवाट, रस्ते मोठे करण्यासाठी जागा लागते. शेतकऱ्यांना त्रास व्हावा असे शासनालाही वाटत नाही. परंतु, पूर्वीच्या काळात मातीमोल किमतीने जागा घेतल्या जात होत्या. आता किमान बाजारमूल्य दराच्या (रेडिरेकनर) चारपट रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जमीन मालक जागा देत नाहीत. त्यामुळे भूसंपादन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. योग्य तो मोबदला दिला जाईल,’ असे पवार म्हणाले.
ते म्हणाले, ‘चाकण एमआयडीसीमधील १५ वर्षांपूर्वी आणि आत्ताच्या वाहतुकीत मोठा फरक पडला आहे. वाहतूक वाढली. याकडे बाकी कोणी बघत नाही. मी लक्ष घालून किमान त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. विविध शासकीय संस्थांना सूचना देऊन चाकणमधील चौकाचे रुंदीकरण केले आहे. चाकणमध्ये चारपदरी उड्डापूल करण्यास मान्यता दिली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर असा पूल असणार आहे. पुलाच्या खाली सहापदरी मार्ग करावा अशी भूमिका आहे. चारपदरीचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर मार्गिका वाढवून सहा केल्या जाणार आहेत.
‘पवार कुटुंबाची यंदा दिवाळी नाही’
पवार कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. राज्यातील अनेक भागांत पूर परिस्थितीमुळे मोठे नैसर्गिक संकट आले आहे. त्यामुळे यंदा पवार कुटुंबाचा दिवाळीतील पाडवा एकत्रित साजरा होणार नाही.
‘विरोधकांनी शंकांचे समाधान करून घ्यावे’
‘निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत, यासाठी शासन आग्रही आहे. ज्याला कोणाला वाटते, त्याने निवडणूक आयोगाकडे जावे. प्रश्न विचारावेत. शंकेचे समाधान करून घ्यावे,’ असेही ते म्हणाले.