पिंपरी-चिंचवड : दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पवार कुटुंबातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिवाळी पाडव्याची उत्सुकता होती. परंतु, यावर्षी पवार कुटुंबाचा पाडवा होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारण स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “यावर्षी पाडवा होणार नाही. कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. मराठवाड्यातही शेतकरी अडचणीत सापडला आहे. पूरग्रस्त भागात वाईट परिस्थिती आहे, त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अनेक जण पूग्रस्तांच्या घरी फराळ पाठवत आहेत. कुणी शिधा पाठवत आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत करून त्यांना उभं करता येईल असे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं पॅकेज देण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवारांचा जनसंवाद…
अजित पवारांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये जनसंवाद घेतला. शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन अजित पवारांची भेट घेतली. काही तक्रारींचं निवारण झालं. काहींना प्रतीक्षा करावी लागली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे विशेष असं लक्ष दिलं आहे.