बारामती : सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. श्री. पवार यांनी बारामती शहरातील तीन हत्ती चौक परिसर सुशोभिकरण, कुस्ती महासंघ शेजारील कामाची आखणी अंतिम करणे, कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसर, घारे साठवण तलाव सुशोभीकरण आणि पदपथाचे काम, सेंट्रल पार्क सुशोभीकरण आणि प्रशासकीय भवनच्या बाहेरील रंगकामाची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

सेंट्रल पार्क परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ, जलतरण तलावकरीता ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरश्या बसवाव्यात. कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे. बारामती शहरातील तीन हत्ती चौक परिसर सुशोभीकरणाची कामे करताना परिसरातील जागेचा पुरेपूर वापर करावा. दीपस्तंभाचे काम करण्यापूर्वी जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुस्ती संघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसरात पदपथाचे कामे करताना संरक्षक भिंतीतून पाणी गळती होणार नाही, याचा विचार करुन कामे करावीत. नागरिकांकरीता शौचालय उभारण्यात यावे. ज्येष्ठांनाही या पदपथावर फिरताना त्रास होणार नाही, याचाही विचार करावा. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी, असे ही निर्देश अजित पवार यांनी दिले.