पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमाअंतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी शुक्रवारी संपर्क साधला. चहा आणि नाश्ता करत पवार यांनी राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. अमृृततुल्यमध्ये घेतलेला चहा, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन केलेले भोजन आणि विविध मंदिरातील दर्शन, अजित पवार यांच्या स्वागतासाठीची झालेली जोरदार तयारी, पवार यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांमुळे परिवार मिलन कार्यक्रमात रंग भरला.
महापालिकेकडून होत असलेल्या जास्त कराची आकारणी, पायाभूत सुविधांचा अभाव, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन संदर्भातील तक्रारी स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवारी केल्या. या सर्व तक्रारी दूर करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस परिवार मिलन आणि जनसंवाद असे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याची सुरुवात गेल्या महिन्यात हडपसर विधानसभा मतदारसंघापासून झाली होती. त्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघातही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी खडकवासला मतदारसंघात परिवार मिलन कार्यक्रम घेण्यात आला. धनकवडी परिसरातून या उपक्रमाला सुरुवात झाली.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, दिलीप बराटे, बाबा धुमाळ, प्रवीण शिंदे, शुक्राचार्य वांजळे, माजी नगरसेवक बाळासाहेब कापरे, अक्रुर कुदळे, राहुल पोकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कानिफनाथ चौक, गुलाबनगर, दत्तनगर, बालाजीनगर, धनकवडी, किरकिटवाडी, धायरी, उत्तमनगर, खडकवासला, कोंढवे-धावडे, शिवणे, कोपरे, वारजे भागाला भेट देत पवार यांनी जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांबरोबर त्यांनी गप्पाही मारल्या. या दरम्यान माणिक रजपूत या जुन्या कार्यकर्त्याशी त्यांची भेट झाली.
चहा, पाणीपुरीचा आस्वाद
धनकवडी परिसरातील अमृततुल्यमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर चहाचा आस्वाद घेतला. तसेच दत्तनगर येथे पाणीपुरी आणि भेळेचाही आनंद त्यांनी लुटला. या दरम्यान एका महिने त्यांना भाजीपाला भेट दिला. पवार यांच्या या उपक्रमावेळी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
‘पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेच्या कालावधीत केलेली कामे सर्वांनी पाहिली आहेत. त्यामुळे महापालिकेची सत्ता मिळाली तर पुण्याचा विकास करून दाखवीन,’ असे पवार यांनी यावेळी सांगितले. सोसायट्यांचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबतच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केेले.
आज जनसंवाद
खडकवासला मतदारसंघात हा मेळावा गेल्या महिन्याच्या शेवटी होणार होता. मात्र, मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अजित पवार यांनी तातडीने मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. या मतदारसंघात उद्या, शनिवार (११ ऑक्टोबर) जनसंवाद कार्यक्रम होणार आहे.