सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचा अप्रत्यक्षपणे टोला
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले. त्या आंदोलनाला अखेर यश आले. पण, त्या आंदोलनानंतरदेखील राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चा सुरूच आहे. तर मुंबईतील आंदोलनादरम्यान शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची मराठा आंदोलकांनी गाडी अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.
त्या सर्व घडामोडींदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. त्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार भाषण करतेवेळी म्हणाले, जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, आमच्यासोबत प्रचंड बहुमत आहे. जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे, ही भावना आमच्या सर्वांची असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, वेगवेगळे प्रसंग उद्भवतात, परंतु ते शांतपणे, सामोपचारांनी मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे; पण समोरची काही लोकं टपूनच बसलेली असतात की आपण इतके कमी निवडून आलो आहोत, आपल्याला काही तरी संधी मिळाली पाहिजे.
मुंबईत चार-पाच दिवसांपूर्वी जे काही घडलं, त्यावेळी आपल्याला काही राजकीय फायदा होतोय की काय असा काहींनी केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. काही जण चॅनेलसमोर जायचे आणि बोलायचे, पण आता उत्तर मिळालं आहे. आता सगळे गपगार पडले आहेत, पण अजून कसं काय होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. पण एकच सांगू इच्छितो की सगळंच चांगलं होईल, असे सांगत अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.