जळगावातील पाचोऱ्यात आज ( २३ एप्रिल ) ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात ठाण मांडून आहेत. त्यात संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. १५ दिवसांत सरकार कोसळणार, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.

संजय राऊत काय म्हणाले?

“सर्व सरकारच भ्रष्ट आहे. पुढील पंधरा दिवसात हे सरकार कोसळणार आहे. सरकारचं ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. त्यावर सही व्हायची बाकी आहे. पुष्पचक्र अर्पण करा,” असं म्हणतं संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “‘डेथ वॉरंट’ निघालं, १५ दिवसात सरकार कोसळणार”, राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले…

पुढील पंधरा दिवसात सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्यावर काहीही बोलायचं नाही. संजय राऊत आणि माझी नागपूरमधून एकत्र येत असताना भेट झाली होती. त्यानंतर समक्ष आणि फोनवर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. संजय राऊतांनी कोणत्या आधारे वक्तव्य केलं माहिती नाही. अनेकजण अशी वक्तव्यं करतात. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची माहिती माझ्याकडं नसल्याने त्यावर काय बोलू?,” असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्ही…”; जळगावातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटाला इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, की स्वत: लक्ष घालून परवानगी मिळवून घेतो. नागपूरमधील ‘वज्रमूठ’ सभेला परवानगी देताना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्याचा वापर करून सभा घेता येतात. फक्त सभेत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा कोणाच्या भावना दुखवणार नाहीत, अशी भाषणे केली पाहिजेत,” असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.