अजितदादांच्या पिंपरी दौऱ्यात बालेकिल्ल्याच्या पुनर्बाधणीवर भर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच दिवशी भरगच्च कार्यक्रम स्वीकारण्याची परंपरा आता सत्तेत नसतानाही कायम ठेवली आहे. पाच सप्टेंबरला अजितदादांचा दिवसभराचा िपपरी दौरा असून सलग कार्यक्रमांच्या भरण्यामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. पक्षाची विस्कळीत यंत्रणा, गटबाजी, रुसलेले नेते, महापालिका आणि पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी यांच्यातील वाढती दरी आणि ‘स्मार्ट सिटी’चे तापलेले राजकारण, या पाश्र्वभूमीवर, अजितदादांचा या दौऱ्यातून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बालेकिल्ल्याची पुनर्बाधणी करण्यावर भर राहणार आहे.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता अजितदादांच्या हस्ते काळेवाडीत पादचारी भुयारी मार्गाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर सलग कार्यक्रमांची रेलचेल आहे. सांगवीत बीआरटी मार्गाचे व त्यानंतर बसस्टेशनचे उद्घाटन होणार आहे. निगडीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चौथरा उभारणीचे भूमिपूजन, चिंचवड स्टेशन येथील पादचारी पुलाचे भूमिपूजन होणार आहे. दुपारी लांडगे नाटय़गृहात सकाळी शिक्षक दिनाचा व दुपारनंतर माध्यमिक शाळांमध्यील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
पालिकेच्या विकासकामांची भूमिपूजने व उद्घाटने करण्याचा धडाका लावून शहरविकासाचे श्रेय घेण्याचा राष्ट्रवादीचा अट्टहास दिसून येतो. निवडणुकांच्या तोंडावर अधिकाधिक कामे सुरू केल्याचे चित्र निर्माण करून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने अजितदादांच्या दौऱ्यातून केला आहे. अजितदादांनाही पक्षाची विस्कळीत यंत्रणा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून पक्षात तीव्र नाराजी आहे. स्थानिक नेत्यांच्या शिफारशी डावलण्यात आल्याने ते जाम रुसले आहेत. सुभेदारांच्या गटबाजीची धुसफूस कायम आहे. नगरसेवक पक्षाच्या संघटनात्मक कामाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पालिका सांभाळणाऱ्या नेत्यांचे स्वतंत्र संस्थान आहे, ते कोणालाही जुमानत नाहीत. अजितदादा आले, की सर्व एकत्रितपणे त्यांच्या पुढे-पुढे करतात. त्यांची पाठ वळताच मूळ गुणांवर येतात, ही परिस्थिती वर्षांनुवर्षे कायम आहे. त्यावर अजितदादांनी अद्याप तोडगा सापडलेला नाही.