आकुर्डीतील सर्पोद्यानात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बेधुंद ‘कारभार’
आकुर्डीतील सर्पोद्यानात २० सापांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि गहजब झाला. ते सर्पोद्यान नाहीच, छोटे प्राणिसंग्रहालय आहे, असा ‘शब्दखेळ’ आता सुरू झाला आहे. गेल्या २० वर्षांपासून प्राणिसंग्रहालय वजा सर्पोद्यान या ठिकाणी आहे. त्याचा आतापर्यंतचा प्रवास चुकांकडून अधिक चुकांकडे आणि अनागोंदी कारभाराचा कळस गाठणारा आहे. पूर्ण वेळ अधिकारी नाही, कुशल कर्मचारी नाहीत, अपुरे मनुष्यबळ, समन्वयाचा अभाव आणि खाबूगिरी एवढय़ावरच हे थांबत नाही. तर बाहेरच्या व्यक्तींचा अवेळी वावर, दारूच्या पाटर्य़ा आणि नको ते उद्योगही या ठिकाणी होत असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे.
साधारणपणे २० वर्षांपूर्वी साडेआठ एकर जागेत प्राणिसंग्रहालय सुरू झाले. नंतर त्याचे कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय असे नामकरण झाले, मात्र सर्पोद्यान म्हणूनच त्याची ओळख आहे. विविध भागांत आढळून येणारे साप तसेच प्राणी या ठिकाणी आणून सोडले जातात. मुळातच येथे असलेले प्राणी व आणून सोडलेले प्राणी यांची योग्यप्रकारे निगा राखली जात नाही, प्राण्यांचे हाल होतात, संशयास्पद मृत्यू होतात, अशी जुनी तक्रार आहे. त्यातच पुन्हा घोणस, नाग, धामण, दिवड, तस्कर जातींचे साप तसेच दोन कासव मृत झाल्याने खळबळ उडाली. मृत झालेले साप अक्षरश: सडले होते. मण्यार बाटलीत मरून पडले होते. विषारी आणि बिनविषारी साप एकाच पोत्यात भरून ठेवले होते, ते मृतावस्थेत होते, असे आता उघड झाले आहे. एकूण आठ नाग, १० धामण, चार तस्कर, एक मण्यार, दोन कासव मृत झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आल्याचे सर्पमित्र सांगतात. याबाबतचा चौकशी अहवालही ‘गोलमाल’ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमके दोषी कोणाला धरायचे आणि कोणावर खापर फोडायचे, याविषयी कामचुकार अधिकारी, अकुशल कर्मचारी अन् खाबूगिरीचे उद्योग अधिकाऱ्यांमध्येच वाद आहेत. या सर्व गोंधळात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांची सदोष कार्यपद्धती व मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. या घटनेने िपपरी पालिकेची अब्रूच चव्हाटय़ावर आली असून, काहीही करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
येथील भोंगळ कारभाराला जुनी परंपरा आहे. ‘किंग कोब्रा’ चोरीला गेल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सुरुवातीला वाघ, बिबटे ठेवले होते, आता नाहीत. माकडे होती, मात्र त्रासदायक ठरू लागल्याने त्यांना बाहेर घालवण्यात आले. शृंगी घुबड चोरीला गेले. प्राण्यांची अंडी, सापांचे विष विकण्यात येते. पशुप्राण्यांसाठी असलेले खाद्य उंदीर, घुशीच फस्त करतात, असे भन्नाट किस्से वेळोवेळी बाहेर आले आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये ‘वाइल्ड अँड स्नेक प्रोटेक्शन’ या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्पमित्रांनी आयुक्तांना भेटून येथील कारभाराची पूर्वकल्पना दिली होती. तेव्हा यापुढे खबरदारी घेऊ, असे साचेबद्ध उत्तर त्यांना देण्यात आले होते. त्यानंतरही सापांच्या मृत्यूचे प्रकरण घडलेच. आता प्राणिसंग्रहालयाच्या कारभारात सुधारणा करा, अथवा ते आम्हाला चालवण्यासाठी द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
सर्पमृत्यू प्रकरणावरून आता राजकारण सुरू झाले असून, राजकीय पक्षांना कधी नव्हे तो सापांचा पुळका आल्याचे दिसून येत आहे.
‘डुकरे सांभाळता येत नाहीत आणि अॅनाकोंडा आणायला निघालेत’
िपपरी महापालिकेच्या वतीने या प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुळातच प्राणिसंग्रहालयात आहे त्या प्राण्यांचे जीव सुरक्षित नसताना पैसे खाण्यासाठी नवनवे प्रयोग करण्यासाठी महापालिका अधिकारी तप्तर असल्याचे दिसून येते. त्यातूनच या ठिकाणी ‘अॅनाकोंडा’ आणण्याची सुपीक कल्पनाही तयार होती, मात्र जेव्हा पत्रकारांनी आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता, हा प्रस्ताव त्यांनी तडकाफडकी फेटाळून लावला. ‘डुकरे सांभाळता येत नाहीत आणि अॅनाकोंडा आणायला निघालेत’ या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
- बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट
- प्राण्यांविषयी अज्ञान असणारे कर्मचारी
- काहीही कारण पुढे करून पैसे काढण्याची कार्यपद्धती
- प्राण्यांकडे निगा राखण्याकडे दुर्लक्ष
- भरवस्तीत प्राणिसंग्रहालय नको, नागरिकांची मागणी
आकुर्डीत आहे ते सर्पोद्यान बिलकूल नाही. ते छोटय़ा स्वरूपातील प्राणिसंग्रहालय आहे. तेथे केवळ साप नसून विविध प्रकारचे प्राणी आहेत. जखमी अवस्थेतील सर्प अथवा प्राणी येथे आणून सोडण्याचे काहीच कारण नाही. तेथे तज्ज्ञ कर्मचारी नाहीत, जखमी प्राण्यांवर उपचार करण्याची सुविधा तेथे नाही. सापांचे मृत्यू प्रकरण झाल्यानंतर यापुढे खबरदारी घेण्यात येणार असून अशा प्रकारे सर्प अथवा प्राणी दाखल करून घेतले जाणार नाहीत.
– तानाजी िशदे, अतिरिक्त आयुक्त, िपपरी महापालिका