पिंपरी : आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर सोपानराव गवळी चारमजली वाहनतळाचे तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही ते अजून धूळखातच पडून आहे. वाहनतळ बंद असल्याने भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. भाडे निश्चितीसाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून, तो प्राप्त झाल्यावर निविदा काढल्यानंतर वाहनतळ लवकरच सुरू होईल, असे भूमी आणि जिंदगी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. या रस्त्यावरील पदपथांवर व्यापाऱ्यांकडून विविध विक्रीच्या वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळे मुळातच अरुंद रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. पूर्वी महापालिका आणि भोसरी पोलीस वाहतूक विभागाद्वारे या रस्त्यावर सम-विषम वाहनतळाचे नियोजन केले होते. तसे फलकही महापालिकेने या रस्त्यावर लावले. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. ग्राहक आणि दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या रस्त्यावर नागरिक आणि ग्राहकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

या रस्त्यावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चारमजली वाहनतळ उभारले. या वाहनतळात दीडशे दुचाक्यांबरोबरच ७५ चारचाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहनतळ सुरू झाल्यावर हा रस्ता नो-पार्किंग झोन करण्यात येणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

शहरातील चारमजली पहिले वाहनतळ

शहरातील हे पहिले चारमजली हे वाहनतळ आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभागाच्या स्थापत्य विभागाद्वारे या वाहनतळाचे काम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जून महिन्यात त्याचे उद्घाटन झाले. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या वाहनतळाचे, स्थापत्य विभागाकडून भूमी आणि जिंदगी विभागाकडे होणारे हस्तांतर रखडले होते. स्थापत्य विभागाने चार दिवसांपूर्वी हस्तांतर केले आहे. आता नगररचना विभागाने दरनिश्चिती केल्यानंतर निविदा प्रसिद्ध करून वाहनतळ सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

वाहनतळाच्या दारात कचरा

वाहनतळाच्या उद्घाटनाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने वाहनतळाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर कचरा पडलेला दिसून येत आहे.

भोसरीतील वाहनतळाच्या हस्तांतराच्या कागदपंत्रामधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, भूमी आणि जिंदगी विभागाकडे हस्तांतर करण्यात आले आहे.शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

भाडेदर निश्चिती करून देण्याबाबत नगररचना विभागाला पत्र पाठविले आहे. दराचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर वाहनतळ सुरू करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर हे वाहनतळ सुरू होईल. सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका