पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात (डीपी) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती निलावर नावाच्या व्यक्तीने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) मंगळवारी करण्यात आला. या संदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येतील, असेही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रशांत जगताप यांनी हा आरोप केला. ‘डीपी रद्द करून नागरिकांचा विकासाचा हक्क राज्य सरकारने हिरावून घेतला आहे. डीपी करण्याची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या मध्यस्थांनी शेतकऱ्यांची आणि बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक करत तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे,’ असा आरोपही यावेळी करण्यात आला.
‘माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात डीपी तयार करण्यात आला होता. लोणी काळभोर परिसरात एकरी, तर बाणेर भागात चौरस फुटावर पैसे घेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय निलावरचा वावर हा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात होता. जमिनीवर आरक्षण पडणार आहे किंवा पडले आहे आणि ते बदलू शकतो, असे सांगून निलावर याने शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे घेतले आहेत. निलावरने मंत्रालयाशेजारील मोठ्या हॉटेलमध्ये मंत्र्यासाठी आणि वजनदार आमदारांसाठी खोल्या आरक्षित केल्या होत्या. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येतील,’ असे जगताप यांनी सांगितले.