पुणे : घाऊक बाजारात लसूण, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली असून, टोमॅटोच्या दर तेजीत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार ६०० ते ९०० रुपये दरम्यान आहेत. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर १२० रुपयांच्या पुढे आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१६ जुलै) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटकमधून मिळून ६ ते ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, हिमाचल प्रदेशातून २०० गोणी मटार, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून १ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, टोमॅटो सहा ते साडेहजार पेटी, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भेंडी ३ ते ४ टेम्पो, गवार ३ ते ५ टेम्पो, काकडी ५ टेम्पाे, ढोबळी मिरची ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पाे, कांदा ५५ ते ६० ट्रक अशी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मेथी, कोथिंबिर महाग

पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोथिंबिर, मेथीचे दर तेजीत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत अन्य पालेभाज्यांच्या दरात अल्पशी घट झाली आहे, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ३५ हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ८०० ते २००० रुपये, मेथी- १२०० ते १८०० रुपये, शेपू- ६०० ते १००० रुपये, कांदापात- ६०० ते १२०० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ७०० रुपये, पुदिना- २०० ते ८०० रुपये, अंबाडी- ४०० ते ७०० रुपये, मुळा- ८०० ते १५०० रुपये, राजगिरा-४०० ते ७०० रुपये, चुका-४०० ते ८०० रुपये, चवळई- ३०० ते ७०० रुपये, पालक- ८०० ते १६०० रुपये दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.