आंब्यांचा हंगाम आणखी पंधरवडाभर

पुणे : रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असून पुढील पंधरवडाभर आंब्यांची आवक सुरू राहील. आंब्यांचा हंगाम १५ जूनपर्यंत सुरू राहण्याची  शक्यता व्यापाऱांनी वर्तविली आहे.

बाजारात कर्नाटक हापूसची आवक वाढली असून रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसच्या दरात अल्पशी घट झाली आहे. मार्केटयार्डातील फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. गेल्या रविवारी बाजारात हापूस आंब्यांच्या पाच हजार पेटय़ांची आवक झाली होती. या आठवडय़ात कोकण भागातून तीन ते साडेतीन हजार पेटय़ांची आवक झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून आंब्यांची आवक होत आहे. उष्म्यामुळे आंबा लवकर पक्व होत आहे. सध्या बाजारात तयार आंबे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत.

हंगामाच्या अखेरच्या टप्यातील आंब्यांची प्रतवारी चांगली असून चवीला गोड असल्याचे मोरे यांनी सांगितले. कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, कर्नाटक आंब्याची आवक चांगली होत असली तरी अपेक्षित मागणी नाही. १ जूनपासून बाजारात कर्नाटक हापूसची आवक टप्याटप्याने कमी होत जाईल. बाजारात रविवारी (२६ मे) कर्नाटक हापूसच्या चौदा ते पंधरा हजार पेटय़ांची आवक झाली. केशर, पायरी या जातीच्या आंब्यांना मागणी आहे.

घाऊक बाजारातील आंब्यांचे दर

* रत्नागिरी हापूस (कच्चा, ४  ते ८ डझन पेटी)- ६०० ते १६०० रुपये

* रत्नागिरी हापूस (तयार, ४ ते ८ डझन पेटी)- १२०० ते २००० रुपये

* कर्नाटक हापूस (कच्चा ४ ते ५ डझन पेटी)- ५०० ते ८०० रुपये

* कर्नाटक हापूस (तयार ४ ते ५ डझन पेटी)- १००० ते १४०० रुपये

* पायरी- (४ डझन)- ४०० ते ६०० रुपये

* लालबाग- २० ते ३० रुपये किलो

* बदाम- २० ते ३० रुपये किलो

* तोतापुरी- २० ते २५ रुपये किलो

* मलिका- २० ते ३० रुपये किलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  केशर- ३० ते ५० रुपये किलो