scorecardresearch

“जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा…”, घोडेस्वारीनंतर अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया

अमोल कोल्हे यांनी बैलजोडीसमोर घोडेस्वारी करत आपला शब्द पूर्ण केला. यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवाजी आढळरावांना प्रत्युत्तर दिलं.

“जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा…”, घोडेस्वारीनंतर अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणुकीत शिरूर मतदारसंघातील मतदारांना दिलेला बारीतील घोडेस्वारीचा आपला शब्द अखेर पूर्ण केला आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच अमोल कोल्हे यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देत टोला लगावला होता. यानंतर अमोल कोल्हे यांनी आज (१६ फेब्रुवारी) बैलजोडीसमोर घोडेस्वारी करत आपला शब्द पूर्ण केला. यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना आढळरावांना प्रत्युत्तर दिलं.

अमोल कोल्हे म्हणाले, “जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा महाराजांची शिकवण आहे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळायचं असतं. त्यामुळे ज्यांना घोडी धरेल की नाही अशी शंका होती त्यांना उत्तर मिळालंय. दोन्ही हात सोडून अख्खा घाट घोडेस्वारी केलीय. संसदेचं काम सुरू असताना घाटात येणं शक्य नसल्याने आत्ता घोडेस्वारी केली.”

“घाटात घोडी चालवण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे. पण जनावरांची एक भाषा असते, त्यांच्यासोबत एक नातं असतं. मुक्या प्राण्याशी सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक नातं असतं. जसं माझं माझ्या घोडीशी नातं आहे. त्यामुळे मी तिला सांगितलं माझी काळजी तू घे, तुझी काळजी मी घेतो,” असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

अमोल कोल्हे म्हणाले, “अनेकांना वाटतं चित्रिकरण सोपं असतं, पण ना चित्रिकरण सोपं असतं, ना ही प्रत्यक्षातील घोडेस्वारी सोपी आहे. आव्हान समोर आलं की भिडायचं असतं. आव्हानाला भिडलं की आव्हान सोपं होतं. यापुढील काळातही बैलगाडीची आणखी लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. त्यातून पर्यटन, ग्रामीण रोजगार याला नक्कीच प्रयत्न करत राहू.”

हेही वाचा : VIDEO: अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी

“बैलगाडी शर्यतीचा प्रश्न अद्याप पूर्ण सुटलेला नाही. त्यावर पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी दस्तावेजीकरण आणि इतर पाठपुरावा आम्ही करू,” असंही कोल्हेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2022 at 13:38 IST
ताज्या बातम्या