पुणे : रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास असलेल्या निर्बंधांमुळे संगीतप्रेमी रसिकांना रात्रीचे आणि उत्तररात्रीचे राग ऐकण्याची संधी मिळत नाही. हेच ध्यानात घेऊन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवारी (४ ऑक्टोबर) ‘अमृत वर्षा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी सहा ते पहाटे सहा अशा बारा तासांच्या मैफलीमध्ये रसिकांना रात्री आणि उत्तररात्रीच्या रागश्रवणाची पर्वणी लाभणार आहे. या अनोख्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक नागेश आडगावकर, गायिका रागेश्री वैरागकर, मीनल दातार, आदित्य मोडक, धनश्री घैसास, केदार केळकर, अंकिता जोशी, मेहेर परळीकर, आदित्य खांडवे गायन सेवा सादर करतील, तर पं. संगीत मिश्रा हे सारंगी आणि अनुप कुलथे हे व्हायोलिनवादन सादर करणार आहेत.
रामकृष्ण करंबेळकर, अभिजीत बारटक्के, हृषिकेश जगताप तबलासाथ, तर हर्षल काटदरे, सुधांशु घारपुरे आणि निलय साळवी हे संवादिनी साथ करतील. डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्या गायनाने अमृत वर्षा कार्यक्रमाची सांगता होणार आहे.