पिंपरी : एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना तुरुंगात झालेल्या ओळख परेड मध्ये एका मुलाने ओळखले. त्यामुळे त्या आरोपींना शिक्षा झाली. या कारणावरून चार जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना ८ जुलै रोजी श्रीनगर रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सुनील शेट्टी उर्फ सुनील ठाकूर (२५), सुरज उर्फ पिल्या भालचंद्र शिंदे (१८), शिवऱ्या उर्फ शिवराज ज्ञानदेव चव्हाण (१९), चंग्या उर्फ कृष्णा शामराव धाईजे (२०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी अल्पवयीन मुलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय तलवारे आणि बॉण्ड नावाच्या गुन्हेगारांना एका गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांची येरवडा तुरुंगात ओळख परेड झाली. त्यावेळी फिर्यादी यांनी विजय तलवारे आणि बॉण्डला ओळखल्याचा समज आरोपींचा आहे. मी नव्हतो असे फिर्यादीने सांगण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी कोयत्याने तीन वार करून फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

काळेवाडीत टोळक्याची दहशत, दोघांवर हल्ला

काळेवाडी येथे सात जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करत दोघांवर खुनी हल्ला केल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी जीवन चौकात घडली.याप्रकरणी ऋतुराज प्रमोद निकम (१९, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक श्यामराव निंबाळकर (२१), गोट्या पवार (३०), अनुज निनाजी कोरे (१९), सुशील शिवाजी कोरे (१९), आयुष सुनील खैरे (२०), हर्ष विनोद महाडिक (२०), सागर रमेश शिंदे (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निकम यांना जीवन चौक, काळेवाडी येथे बोलावून घेतले. निकम आणि त्यांचे दोन मित्र तिथे गेले असता आरोपींनी निकम आणि त्यांचा मित्र रोहन रहाटे यांना कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. कोयते हवेत फिरवून आरोपींनी दहशत निर्माण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

वाकडमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने एक कोटी ३४ लाखांची फसवणूक

ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला दहा टक्क्यांहून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून ११ जणांची एक कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. ही घटना २६ जून ते ९ जुलै या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि इतर दहा जणांना आरोपींनी ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास आठ दिवसाला तीन ते साडेतीन टक्के व महिन्याला १० टक्के पेक्षा अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी महिलेला परतावा म्हणून काही रक्कम देण्यात आली. त्याद्वारे विश्वास संपादन करून महिलेकडून २४ लाख ९९ हजार रुपये घेत फसवणूक केली. महिलेप्रमाणेच आणखी दहा जणांची अशा ११ जणांची एक कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली.

श्वान चावल्याचा जाब विचारल्याने धमकी

श्वान चावल्याने त्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला शिवीगाळ करून आणखी श्वान अंगावर सोडण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ८ जुलै मुळशीतील नांदेगाव येथे घडली. साहेबराव ढमाले (६५) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साहेबराव यांच्या पत्नीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव हे त्यांच्या घराच्या पाठीमागे सुरु असलेले बांधकाम पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी यांच्या ताब्यातील श्वानाने साहेबराव यांना चावा घेऊन जखमी केले. याचा जाब विचारला असता आरोपीने साहेबराव आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून आणखी दहा श्वान अंगावर सोडण्याची धमकी दिली.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ९ जुलै रोजी सकाळी तळवडे येथील कॅनबे चौकात घडली.प्रतीक राजकुमार वाबळे (२२, तळवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार वसंत वाबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा त्याच्या दुचाकीवरून कॅनबे चौकातून जात होता. त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात प्रतीक याचा मृत्यू झाला.

चिंचवडमध्ये बनावट सोन्याची चेन गहाण ठेऊन फसवणूक

तांब्याची चेन सोन्याची असल्याचे भासवून सराफी पेढीतून एक लाख रुपये घेऊन जात दुकानदाराची फसवणूक करण्यात आली. ही घटना २७ जून रोजी चिंचवड येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये घडली. श्रीपाल सागरमल सोनिगरा (४५, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १६.३४० ग्रॅम वजनाची तांब्याची चेन सोन्याचे असल्याचे भासवून सोनिगरा ज्वेलर्स दुकानात गहाण ठेवली. दुकानातून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर चेन बनावट असल्याचे उघडकीस आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

बस प्रवासात २१ हजारांची रोकड लंपास

चिंचवड ते वल्लभनगर दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या खिशातून २१ हजार ८०० रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. ही घटना ७ जुलै रोजी दुपारी घडली.दीप रमेश जावकर (२२, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप जावकर हे ७ जुलै रोजी दुपारी तीन वाजता चिंचवड स्टेशन येथून वल्लभनगर दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २१ हजार ८०० रुपये रोख रक्कम गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली.