पुणे: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सर्व नागरी सहकारी बँकांमध्ये सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन केले असून, तिचे उद्घाटन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्या (ता. १४) होणार आहे.

याबाबत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते म्हणाले की, सहकार सप्ताहानिमित्त मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्व बँकांमध्ये एकाच वेळी सहकार ध्वज फडकावला जाईल. याचबरोबर सात दिवस सहकार व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली असून, तिचे थेट प्रसारण असोसिएशनच्या फेसबुक पेजसह इतर समाजमाध्यमांतून केले जाईल. व्याख्यानमालेचे उद्घाटन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता होणार असून, पहिले पुष्प सहकार आयुक्त अनिल कवडे हे गुंफणार आहेत.

हेही वाचा… रेल्वे मालामाल! मालवाहतुकीतून एका महिन्यात ८०२ कोटींचे उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्याख्यानमालेत १५ नोव्हेंबरला तंत्रज्ञान व्यवस्थापन व विविध कायदे या विषयावर ॲड. आशिष सोनावणे, १६ नोव्हेंबरला केवायसी संधी व आव्हान यावर रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, १७ नोव्हेंबरला थकीत कर्जांचे व्यवस्थापन व कायदे यावर ॲड. एन. के. खासबारदार, १८ नोव्हेंबरला सामाजिक माध्यमातून बँकिंग सेवांचे विपणन यावर भाग्यश्री मोहिरे, १९ नोव्हेंबरला सायबर गुन्हे यावर पोलीस उपायुक्त संजय शिंदे आणि २० नोव्हेंबरला नागरी सहकारी बँकांचे प्रशासन यावर शिखर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर हे मार्गदर्शन करणार आहेत, असे मोहिते यांनी सांगितले.