पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह १३ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा आयुष हा बंडू आंदेकरचा नातू होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा आंदेकर टोळीने खून घडवून आणला. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय ६४), आंदेकर याचा नातू तुषार वाडेकर (वय २४), स्वराज वाडेकर ( वय २१), विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर (वय ४०), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय २२, सर्व रा. नाना पेठ), सुजल मेरगू (वय २३) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आरोपी अमित पाटोळे (वय १९), यश पाटील (वय १९) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर (वय ४०), शिवम आंदेकर (वय ३१), लक्ष्मी आंदेकर (वय ६०), अभिषेक आंदेकर (वय २१) शिवराज आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) हे पसार झाले आहेत.
आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकरसह १३ आरोपींविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तयार केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेेकर टोळीविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचे आदेश दिले.
आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई
आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, तसेच साथीदारांनी दहशतीच्या बळावर बेकायदा बांधकामे केली आणि बेकायदा मालमत्तांचा ताबा घेतल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांकडून महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. आंदेकर टोळीला आर्थिक रसद पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आंदेकरच्या घरात झडती
बंडू आंदेकर याचे नाना पेठेतील डोके तालमीजवळ घर आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. आंदेकर याला नाना पेठेत आणण्यात आले. आयुष कोमकर खून प्रकरणात काही पुरावे सापडतात का, या दृष्टीने झडती घेण्याचे काम सुरू होते.