पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘स्वयंचलित क्रमांक पाटी ओळख’ (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन – एएनपीआर) प्रणालीचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) प्रलंबित आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात वाहनांमुळे कोंडी होत असून, प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पुणे विमानतळावरून हवाई उड्डाणे वाढत आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात ‘एएनपीआर’ प्रणालीचा अवलंब करण्याचे प्रस्तावित आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीच्या कॅमेऱ्यांद्वारे परिसरात येणाऱ्या प्रवाशांची; तसेच वाहनांची नोंदणी केली जाणार असून, वाहनांना मर्यादेपेक्षा जास्त विमानतळ परिसरात थांबल्यावर स्वयंचलीत पद्धतीनुसा थेट दंडात्मक कारवाई करता येणे शक्य होणार आहे.

सध्या विमानतळ परिसरात चार ते पाच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून टर्मिनलपर्यंत येणाऱ्या खासगी वाहनांची नोंद केली जाते. त्यांवर नियंत्रण ठेवले जाते. १५ मिनीटांपेक्षा जास्त कालावधी थांबल्यावर ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. विमानतळ परिसरातून दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या रिक्षा, कॅब आणि अन्य प्रवासी वाहनांना ‘एरोमाॅल’पर्यंत जाण्यास परवानगी नाही. मात्र, खासगी प्रवासी वाहनांना टर्मिनलपर्यंत १५ मिनिटांपर्यंत थांबण्याची मुभा देण्यात आली आहे. ही वानहे बिनदिक्कत तासोंतास आत थांबलेली असतात. त्यामुळे कोंडी होत असून प्रवाशांना विमानतळामध्ये ये-जा करताना अडचणी येत आहेत.

या प्रणालीबाबतचा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाने तयार करून एप्रिल महिन्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) पाठवला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे येथीस प्रवाशांच्या अडचणी कायम असून तक्रारी वाढत आहेत.

विमानतळ परिसरात सुरक्षितता आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहनांवरील नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एएनपीआर’ या प्रणालीबाबतचा प्रस्ताव ‘एएआय’कडे पाठवण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ