पुणे : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲपल उद्या (गुरूवारी) पुण्यातील कोरेगाव पार्क येथे पहिले अधिकृत दालन सुरू करीत आहे. हे भारतातील अॅपलचे चौथे दालन असून मुंबई, दिल्ली आणि नुकत्याच बंगळुरूत सुरू झालेल्या दालनांनंतर पुण्यातील हे केंद्र ग्राहकांसाठी खुले होत आहे. हे दालन माध्यमांसाठी बुधवारी खुले करण्यात आले.
ॲपलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल) डिर्ड्रे ओ’ब्रायन म्हणाल्या की, बंगळुरूत दालन सुरू केल्यानंतर केवळ काही दिवसांत पुण्यातील या नवीन दालनाचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. इतिहास आणि सर्जनशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ॲपल चाहत्यांसाठी हे एक नवीन आकर्षण ठरेल. या दालनात अॅपलची सर्व उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. याचबरोबर नवनवीन उत्पादनेही पुणेकरांना या दालनाच्या माध्यमातून खरेदी करता येतील. पुण्यातील या दालनात प्रवेश केल्यानंतर ग्राहकांना अॅपलची विविध उत्पादने अनुभवता येतील. याचबरोबर अॅपल टीव्ही प्लस आणि अॅपल म्यूझिक या सेवाही उपलब्ध असतील. एखाद्या ग्राहकाने ऑनलाइन उत्पादन खरेदी केले असल्यास त्याला दालनातून ते घेऊन जाण्यासाठी विशिष्ट भाग निर्माण करण्यात आला आहे. यामुळे ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सहजपणे शक्य होणार आहे.
दालनाची वैशिष्ट्ये
- अॅपलच्या पुण्यातील दालनात एकूण ६८ कर्मचारी आहेत. हे कर्मचारी देशातील ११ राज्यांतील आहेत.
- ग्राहकांना दालनात नवीन उपकरणे खरेदी करण्याबरोबरच वैयक्तिक मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.
- आयफोन १६ सिरीज, आयपॅड एअर विथ ॲपल पेन्सिल प्रो, एम४ चिपसह मॅकबुक एअर आदी नवे उत्पादन येथे उपलब्ध असतील.
- ॲपल ट्रेड-इन, फायनान्सिंग प्रोग्राम्स आणि ऑनलाइन खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी खास ॲपल पिकअप क्षेत्र उपलब्ध आहे.
- दालन १०० टक्के अपारंपरिक ऊर्जेवर चालणार असून कार्बन उत्सर्जन मुक्त आहे.
‘टुडे ॲट ॲपल’ सत्रे
विद्यार्थ्यांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी मोफत शिकवणी व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यात ‘टेक बेटर फोटो ऑन आयफोन’, ‘कॅप्चर आयडियाज ऑन आयपॅड’, ‘ॲपल इंटेलिजन्स’ आणि ‘गेट स्टार्टेड: मॅक’ अशा सत्रांचा समावेश आहे. ग्राहक apple.com/in/today वर जाऊन या कार्यशाळांसाठी नोंदणी करू शकतात. तसेच स्थानिक कलाकारांच्या गाण्यांचा खास प्लेलिस्ट व वॉलपेपर्स डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
उद्घाटन कधी?
‘ॲपल कोरेगाव पार्क’ हे दालन कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये गुरुवारी (ता.४ सप्टेंबर) रोजी दुपारी १ वाजता पुण्यातील ग्राहकांसाठी खुले होणार आहे.
अॅपलने भारतात विस्तार करताना पुण्याची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या ब्रँडचे ग्राहक पुण्यात आहेत मात्र, त्यासाठी योग्य जागा उपलब्ध नव्हती. आम्ही कोपाच्या माध्यमातून व्यवसायांसाठी एक चांगली जागा निर्माण केली आहेत. अॅपलने कोपाची निवड केल्याने अधोरेखित झाले आहे. – अश्विन पुरी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, लेक शोअर