पुणे : अफगाणिस्तानातील सफरचंदे इराणमार्गे भारतात विक्रीस पाठविण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आल्यानंतर अफगाणिस्तानातील सफरचंदे इराणमधून समुद्रमार्गे विक्रीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. पुणे -मुंबईतील फळ बाजारात अफगाणी सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानातील व्यापार बंद करण्यात आला आहे. वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून भारतात पाठविण्यात येणारा सुकामेवा, सफरचंदे आता समुद्रमार्गे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अफगाणिस्तानातील माल समुद्रमार्गे पाठविण्यात येत असून, त्यामुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. मात्र, ट्रकमधून पाठविण्यात येणाऱ्या मालाची हाताळणी जास्त प्रमाणावर होत असल्याने मालाच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे,’ असे छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंद व्यपाारी, श्री गुरुदत्त इम्पॅक्टचे संचालक शिवजीत सत्यजीत झेंडे यांनी सांगितले.
‘मार्केट यार्डातील फळबाजारात काश्मिर, हिमाचल प्रदेशासह परदेशातून मोठ्या प्रमाणावर सफरचंदे विक्रीस पाठविण्यात येतात. यंदा हिमाचल प्रदेश आणि काश्मिरमध्ये अतिवृष्टी झाल्याने सफरचंदांच्या लागवडीवर परिणाम झाला. देशी सफरचंदांचा हंगाम शेवटच्या टप्यात आला असून, अफगाणिस्तानातील सफरचंदांचा हंगाम पंधरा दिवस आधी सुरू झाला आहे. अफगाणिस्थानातील सफरचंदांची प्रतवारी चांगली आहे’, असे झेंडे यांनी नमूद केले.
आरोग्यदायी सफरचंदे
अफगाणिस्तानातील सफरचंदे ही तोड करुन भारतात विक्रीस पाठविण्यात येत आहे. ही सफरचंदे परदेशी सफरचंदांप्रमाणे शीतगृहात साठविण्यात आलेली नसतात. त्यावर वॅक्स प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे ही सफरचंदे ताजी आणि आरोग्याच्यादृष्टीने चांगली असतात. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने अफगाणिस्तानातील सफरचंदांच्या दरात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
अफगाणिस्तानातून सफरचंदे रस्तेमार्गे इराणला पाठविण्यात येतात. इराणहून ते समुद्रमार्गे मुंबईतील बंदरात येतात. तेथून देशभरात विक्रीस पाठविली जातात. सफरचंदाची हाताळणी कमी झाल्याने प्रतवारीही चांगली आहे. गेल्या वर्षी घाऊक बाजारात दहा किलो अफगाणी सफरचंदांना ८०० ते ९०० रुपये दर मिळाला होता. यंदा दहा किलो सफरचंदांना प्रतवारीनुसार ९०० ते १००० रुपये दर मिळाले आहेत.
सफरचंदांचे घाऊक बाजारातील दर
काश्मिर (१४ ते १६ किलो) – १००० ते १४०० रुपये
किन्नोर (१० किलो) – १६०० ते १८०० रुपये
अफगाणिस्तान (१० किलो) – ९०० ते १००० रुपये
