महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) पुणे मंडळाकडून साडेपाच हजारांहून अधिक सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. मात्र सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने केवळ १९ हजार अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे या सोडतीमधील घरांसाठी अर्ज करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे ५८६३ सदनिकांच्या सोडतीसाठी ६ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात गणेश दर्शनावरून स्पर्धा
बुधवारपर्यंत (२७ सप्टेंबर) घरांसाठी अर्ज करण्याची मुदत होती, तर अनामत रक्कम भरण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. ऑनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी २९ सप्टेंबर ही अंतिम तारीख होती. मात्र, अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना अर्जासोबतच बारकोड असलेला रहिवास दाखला, आर्थिक विवरण पत्र आणि इतर कागदपत्रे सादर (अपलोड) करायची आहेत. त्यानंतर उत्पन्न गटानुसारच अर्जदाराची पात्रता निश्चित करून सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज आणि पैसे भरणा करता येत आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि सर्वसाधारण योजनेसाठी (२० टक्के) स्वतंत्र संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे असल्याने अर्जदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पूर्तता केलेली कागदपत्रे वैध ठरविण्यासाठी लागणारा वेळ, दोन वेगवेगळी संकेतस्थळे या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.