पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रमांसाठी शनिवारी (३१ मे) प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना मंगळवारी २७ मेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
विभागप्रमुख डॉ. संजय तांबट यांनी ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे सकाळी आठ ते दहा या वेळेत ‘पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रम’ आणि सायंकाळी सहा ते आठदरम्यान ‘डिजिटल मीडिया प्रगत अभ्यासक्रम’ हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येतात. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील ‘रानडे इंस्टिट्यूट’च्या आवारात हे एका वर्षाचे पदविका अभ्यासक्रम दोन सत्रांत शिकवले जातात. पदवी उत्तीर्ण असलेला कोणत्याही शाखेतील विद्यार्थी अभ्यासक्रमांसाठी पात्र असून प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते, असे डॉ. तांबट यांनी सांगितले.
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी, (३१ मे) ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रमासाठी सकाळी दहा ते दुपारी एक, तर डिजिटल मीडिया प्रगत अभ्यासक्रमासाठी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे डॉ. तांबट यांनी स्पष्ट केले.