पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ही नियुक्ती केली असून, डॉ. चौधरी यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
आयआयटी, मुंबई व हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. चौधरी हे जैवइंधन, जैवरसायन या क्षेत्रांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या प्राज इंडस्ट्रीज या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. चौधरी यांनी या पूर्वी सीओईपीच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. सीओईपीचे विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर पहिल्या पूर्णवेळ नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. चौधरी यांना मिळाला आहे. डॉ. चौधरी यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही झाला आहे.




हेही वाचा >>>पुणे : पत्नीचीच आक्षेपार्ह छायाचित्रे केली सोशल मीडियावर व्हायरल
सीओईपी विद्यापीठाच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी नियुक्तीबाबत डॉ. चौधरी म्हणाले, की राज्य सरकारने सीओईपीसारख्या प्रतिष्ठित संस्थेची एक मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवल्याचा आनंद आहे. संस्थेच्या लौकिकात भर टाकणारी कामगिरी करून संस्थेचे मानांकन उंचावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. उद्योगांच्या आजच्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये असणारे अभियंते निर्माण करून अभियांत्रिकी क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर आघाडीचे स्थान प्राप्त करायचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाऊले उचलून कालबद्ध आरखडा तयार करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल.