पुणे : गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पर्यावरणवाद्यांची जोरदार जुंपली. परवानगी नसताना बैठकीत मध्येच उठून पर्यावरणवाद्यांनी त्यांची मते मांडल्याने उपस्थित गणेश मंडळाचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. यामुळे एकच गोंधळ उडाला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद थांबला शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाची रूपरेषा आणि आयोजन ठरविण्यासाठी महापालिकेने शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती.
महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीला आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला परवानगी नसतानाही काही पर्यावरणवादी मंडळी सभागृहात उपस्थित होती.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात असताना काही पर्यावरणप्रेमी मंडळींनी विरोधी मते मांडल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते चिडले. ‘यांना बोलून देऊ नका,’ अशी मागणी केली जात होती. मात्र, त्यानंतही काही पर्यावरणवाद्यांनी बोलणे सुरूच ठेवले. त्यातच एक पर्यावरणवादी हिंदी भाषेत बोलू लागल्याने त्याला मराठीत बोलण्यास सांगण्यात आले. मात्र, दुर्लक्ष करून त्याने हिंदीतून बोलणे सुरूच ठेवल्याने काही कार्यकर्ते त्याच्यावर धावून गेले. यानंतर महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी संबधित व्यक्तीला बाहेर काढले. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत महापालिका प्रशासनाला अनेक सूचना केल्या. वाहतूक नियोजन, रस्त्यांवरील स्वच्छता, पोलिस मदत कक्ष, मेट्रो याबाबत विविध प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. बैठकीला काही पर्यावरणवादी उपस्थित होते. त्यांनीदेखील या बैठकीत ध्वनिप्रदूषण, शाडूच्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा वापर टाळावा या बाबत सूचना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाराज झालेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ही बैठक केवळ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगत आम्हाला बोलण्याची संधी द्या, असे म्हणत इतरांना बोलण्यास विरोध केला. मात्र याकडे दुर्लक्ष करत काही पर्यावरणवाद्यांनी आपले बोलणे सुुरुच ठेवल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी विरोध दर्शवित एका महिलेला बोलण्यापासून थांबविले. यानंतर आणखी एका पर्यावरणवाद्याने हिंदीतून बोलण्यास सुरुवात केल्याने संतप्त कार्यकर्ते त्याच्या अंगावर धावून गेले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर महापालिका आयुक्तांनी मध्येच हस्तक्षेप केल्याने वाद थांबला.
गणेश मंडळांवर विचार लादण्याचा प्रयत्न
सभागृहात झालेल्या गोंधळानंतर बोलताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ही बैठक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी असून इतरांना सभागृहात येण्याची परवानगी कशी मिळाली. हे लोक कुठून तरी येतात आणि त्यांचे विचार गणेश मंडळांवर लादतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते हातात हात घेऊन काम करत आहेत. ढोल ताशा पथकांना देखील सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. वर्तमानपत्रे देखील ढोल पथकांच्या विरोधात भूमिका घेतात. त्यामुळे प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी घाटे यांनी केली.
महपालिकेत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इतर नागरिक देखील सहभागी झाले. देशाचे नागरिक म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, यापुढे केवळ मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी बैठक घेतली जाईल. तशी व्यवस्था केली जाईल.- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त