पुणे : घरातून किरकोळ कारणावरून भांडण करून अनेक मुले पळून जातात. अशी मुले ही प्रामुख्याने रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. अशा मुलांना शोधून त्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याचे काम मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केले आहे. यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अशा १९१ मुलांची सुटका करून त्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाकडून घरातून पळून आलेल्या अथवा हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जाते. यंदा पहिल्या सहामाहीत पुणे विभागात १९१ मुलांचा शोध घेण्यात आला. त्यात १८७ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे. त्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे घर सोडून पळून आली होती. काही मुले ही चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता पळून आली होती. ही मुले फलाटावर अथवा रेल्वे स्थानकांच्या परिसरात आढळली. तसेच, कर्मचाऱ्यांना गाड्यांमध्येही काही मुले आढळली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

हेही वाचा >>> आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

प्रवाशांचा ऐवज परत

पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांचा ऐवज शोधून त्यांना परत केला आहे. जून महिन्यात अंदाजे १ लाख ४२ हजार २६२ रुपयांचे मोबाइल, बॅग, लॅपटॉप आदी सामान शोधून प्रवाशांना देण्यात आले. याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाकडून बेकायदा तिकीट विक्रीत गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई सुरू आहे. या प्रकरणी जानेवारी ते जून या कालावधीत १५ दलालांना अटक करण्यात आली.