भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात गुरुवारी केली. भाजप बूथ समिती अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार असून, येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> पुणे : संघाप्रमाणे आठवड्यातून एकदा एकत्र या; ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. आगामी निवडणुका लक्षात घेऊन विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार असल्याने भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचेही स्पष्ट झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकार येत्या काही दिवसांत तसा निर्णय घेईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की या पदांवर भाजपच्या सव्वालाख आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे बूथ समितीचे अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही संधी देण्यात येणार असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच या नेमणुका होतील. त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही.