गणेशोत्सवात डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे साकारणारे कलाकार अनेकदा पडद्यामागेच राहतात. पण, हे कलाकार आपल्या देखण्या हातांनी साकारलेल्या कलाविष्कारातून गणरायाची पूजा बांधत असतात.
ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय विषयांवरील देखाव्यांबरोबरच गणेशोत्सव मंडळांनी साकारलेली वैविध्यपूर्ण मंदिरे गणेशोत्सवामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे’ या ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीची प्रचिती विविध मंडळांनी साकारलेले देखावे पाहताना नागरिकांना येते. डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे साकारणारे कलाकार अनेकदा पडद्यामागेच राहतात. पण, आपल्या देखण्या हातांनी साकारलेल्या कलाविष्कारातून हे कलाकार गणरायाची पूजा बांधत असतात.
गणेशोत्सव ही कार्यकर्ते आणि कलाकार घडविणारी महत्त्वपूर्ण कार्यशाळा. दर वर्षीच्या उत्सवामध्ये याचे प्रत्यंतर येते. काही महत्त्वाच्या गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गणेशभक्त केवळ अगदी देशाच्या विविध भागांतून आणि परदेशातूनही येतात. हे देखावे समाजमाध्यमांद्वारे जगभरात पोहोचविण्याचे काम करून गणेशभक्त एक प्रकारे हे देखावे साकारणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात. त्यामुळे गणेशोत्सवातील आपला देखावा अत्युत्तम झाला पाहिजे, असा कटाक्ष ठेवून काम करण्यासाठी कलाकारांबरोबरच गणेश मंडळांचे कार्यकर्तेही राबत असतात.
अभिनव कला महाविद्यालय म्हणजे गणेशोत्सवात देखावे साकारणाऱ्या कलाकारांची खाणच. येथे अध्यापन करणारे डी. एस. खटावकर हे तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष होते. खटावकर यांनी या वर्षी कोणता देखावा साकारला ते पाहण्याची उत्कंठा नागरिकांमध्ये असायची. त्यांचे पुत्र विवेक खटावकर, जीवन रणधीर आदींनी ही परंपरा पुढे नेली. आता विवेक खटावकर यांचे पुत्र विराज व विपुल आणि जीवन रणधीर यांचा पुत्र क्षितिज रणधीर हा वारसा पुढे नेत आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा देखावा आणि एम. एल. कुलकर्णी हे अनाेखे समीकरण कुलकर्णी यांच्या निधनापर्यंत कायम होते. त्यानंतर विवेक खटावकर, अमन विधाते यांनी देखावे साकारले. ‘अभिनव’चा विद्यार्थी विशाल ताजनेकर गेल्या काही वर्षांपासून अखिल मंडई मंडळाचे देखावे साकारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेल्या नितीन देसाई यांनी हुतात्मा बाबू गेनू मंडळासाठी भव्य-दिव्य देखावे साकारले होते.
जीवन रणधीर यांच्या तालमीत तयार झालेल्या क्षितिज या युवकाने गणेशोत्सवात काम करूनच आपल्या अनुभवाचे क्षितिज विस्तारले. यंदा त्याने दर्शन मित्र मंडळासाठी साकारलेला ‘महाकुंभमेळा’ हा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला. तर, विसर्जन मिरवणुकीमध्ये वीर हनुमान मित्र मंडळासाठी साकारलेला ‘दिव्यांग गौरव रथ’ आणि पुणे महापालिका सेवक वर्ग गणेशोत्सव समितीसाठी साकारलेला ‘सेवक गौरवरथ’ नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आमिर खान प्राॅडक्शन्ससाठी सहायक कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या क्षितिजने आपल्या कलात्मकतेची प्रचिती गणेशोत्सवामध्ये दिली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसाठी विनायक रासकर यांनी यंदा तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ मंदिराची साकारलेली प्रतिकृती लक्षवेधक होती. विसर्जन मिरवणुकीसाठी साकारलेल्या श्री गणनायक रथानेही भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असलेल्या कोथरूड येथील साई मित्र मंडळासाठी वेरुळ येथील कैलास मंदिराची प्रतिकृती विनायक रासकर यांनीच साकारली होती.
‘कृष्णकुंज’ या देखाव्यामध्ये झुलत्या झोपाळ्यावर विराजमान अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक देखाव्याने मंत्रमुग्ध झाले. विशाल ताजनेकर यांनी साकारलेला हा देखावा आकर्षक प्रकाशझोतांमुळे लक्षणीय ठरला. तर, विसर्जन मिरवणुकीसाठी विद्युत रोषणाईने सजविलेला श्री गणेश सुवर्णयान रथही ताजनेकर यांनीच साकारला होता. जहाजासारखा आकार असलेल्या या रथाला जहाजावरील सर्च लाइट आणि रोषणाईने उजळून टाकले होते. डी. एस. खटावकर यांचा नातू विराज खटावकर या युवा कलाकाराने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या होनाजी तरुण मंडळासाठी ‘विश्वविनायक धाम’ हा देखावा, तर विसर्जन मिरवणुकीसाठी ‘आदित्येश्वर रथ’ साकारला होता.