भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ काय, असे जर संक्षिप्त स्वरूपात सांगायचे झाले तर असे प्रथा, परंपरा, श्रद्धेने जपणारी आणि काळानुरूप उपयुक्त असे परिवर्तनाचे नवे स्रोत स्वीकारणारी.. असे केले जाते. औंध गावठाणाचा वेध घेता, हीच बाब अधोरेखित होते. तुलनेने विरळ लोकवस्ती, ब्रिटिशकालीन वास्तुखुणा, पुरातन मंदिरे, शिक्षण संस्था, मल्टिस्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स, मॉल्स आणि आयटी कंपन्यांच्या टोलेजंग इमारती, स्मार्ट सिटीतील चकाचक रस्ते, त्याचबरोबर गावठाणातील छोटेखानी पाऊलवाटा, कौलारू घरे, जुने पार, नळकोंडाळी, पांढऱ्या मातीच्या विटांच्या भिंती.. असे सर्व काही येथे पाहायला मिळते. पारंपरिक वेशातील गावकरी मंडळींबरोबर, येथील रस्त्यांवर, कॉस्मोपॉलिटन जनजीवन आणि नव्या ढंगाच्या तरुणाईचा वावर सातत्याने दिसतो.
सेनापती बापट रस्ता, जिथे चतु:शृंगीला पोचतो, त्या कोपऱ्यापासून पुढे पुणे विद्यापीठ, स्पायसर कॉलेज, एनसीएल आणि मुळा नदीकाठ अशी औंधची विस्तारित सीमा आहे. गावाचे मूळ हे चतु:शृंगी देवस्थान परिसर असले तरी सद्य:स्थितीत गावठाण भाग हा हमरस्त्यावरून दिसणाऱ्या, बॉडी गेटच्या मागे आणि भैरवनाथ मंदिर परिसरातच पाहायला मिळतो. पुण्यनगरीइतकाच आसपासच्या परिसरालाही इतिहास असून, त्याचे धागेदोरे, शिवकाळ आणि पेशवाई तसेच इंग्रजी आमदानीस जोडलेले दिसतात. त्यातील आख्यायिका, कागदपत्रांचे तपशील, दृष्टान्त, साक्षात्कार इ.चा विचार प्रस्तुत लेखात करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवासातील मोजक्याच स्थानकांचा आपण आढावा घेऊ.
औंधच्या इतिहासात, चतु:शृंगी परिसराचे स्थान मोठे आहे. पेशव्यांचे सावकार दुर्लभशेठ हे सप्तशृंगी देवीचे भक्त होते. वयोमानानुसार त्यांना देवीदर्शनासाठी पायी वारी करणे अशक्य झाल्यावर देवीच्या दृष्टान्तानुसार गणेशखिंडीच्या वाटेवरच त्यांना दगडी खोबणीत देवीची मूर्ती आढळली. या शोधयात्रेनंतर लगेचच १७८६ मध्ये या मूर्तीच्या जागी छोटेखानी मंदिराचे कोंदण बांधून, नित्यनेमाने पूजाअर्चा होऊ लागली. भांबुर्डा आणि पाषाण यांच्यामधील परिसरात वर्दळ आणि वस्ती वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणून या मंदिराचे स्थान विचारात घ्यावे लागते.
पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी अमलात या परिसराने इंग्रजांचे लक्ष वेधले. डोंगररांगा आणि हिरव्यागार दाट झाडीने वेढलेल्या या परिसराकडे आकर्षित होऊन याच परिसरातील पाचशेबारा एकर परिसरात १८६४ साली गव्हर्नर साहेबांसाठी आलिशान निवासस्थान बांधण्यास सुरुवात झाली. गव्हर्नर सर बार्टल फ्रिझर यांच्या कारकीर्दीत दुबशॉ या आर्किटेक्टने केलेल्या डिझाइनप्रमाणे सी. ई. हॉवर्ड या इंजिनिअरने १८७१ साली हा प्रकल्प पूर्ण केला. नैसर्गिक झाडी, पायवाटा आणि नोकरचाकर, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, अशा सर्वामुळे परिसर गजबजून गेला आणि पाषाणकडे जाणारा रस्ता आणखी प्रशस्त झाला. गव्हर्नरचा बंगला म्हणून ख्यातकीर्त असलेली ही वास्तू स्वातंत्र्योत्तर काळात पुणे विद्यापीठ म्हणून नावारूपास आली.
औंध परिसर लक्षवेधी ठरण्याची इतर कारणेसुद्धा जाणून घेतली पाहिजेत. सहलीचे ठिकाण म्हणूनही चतु:शृंगी परिसर नावारूपास आला. इथल्या निसर्गरम्यतेची भुरळ अनेकांना पडली. पुण्यातील गाजलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात गावातून स्थलांतरित होऊन अनेकांनी याच परिसरात तात्पुरती निवासस्थाने उभारली. ती पुढे कायमचीच झाली. अनेक उच्चभ्रू मंडळींनी या परिसरात बंगले बांधले, तसेच बांधकाम मजुरांच्या कायमच्या वस्त्या देखील उभ्या राहिल्या.
कोणतेही गाव वसताना तेथील ग्रामदैवताचा विचार करावा लागतो. भैरवनाथ मंदिर ही औंधची पूर्वापार अस्मिता आहे. चतु:शृंगी परिसरात असलेली सुमारे शंभर-दीडशे घरांची वस्ती आता सत्तर हजार लोकसंख्येपुढे गेली असली तरी नव्या जमान्यातही ग्रामदैवताचे माहात्म्य टिकून आहे. रानात चरणाऱ्या गुरांच्या कळपातील एक गाय रोज ठराविक ठिकाणी पान्हा सोडत असे. त्या जागेचा शोध घेऊन उत्खनन केले असता स्वयंभू शिवलिंग प्राप्त झाले. गावच्या पाटलासही हा दृष्टान्त होऊन त्याने ग्रामस्थांच्या मदतीने इथे भैरवनाथाचे मंदिर उभारले अशी वदंता आहे. गुरवाला झालेल्या दृष्टान्तातून मुळा नदीकाठी असलेल्या पांगाऱ्याच्या झाडाशी उत्खनन केले असता भैरवनाथ प्रकट झाले आणि सुभेदाराच्या मदतीने ग्रामस्थांनी ते मंदिर उभारले, अशी दुसरी आख्यायिका आहे. एक मात्र नक्की आहे की दैवी अधिष्ठानाची श्रद्धा प्रेरणादायी ठरत असल्याने गावचा विकास झपाटय़ाने होतो हे निर्विवाद आहे.
औंध गावठाण आणि परिसरातील निवडक महत्त्वाची देवस्थाने आणि त्यांच्या उत्सव परंपरांचा आता मागोवा घेऊ. भैरवनाथ या ग्रामदैवताबरोबर हनुमान, महादेव, शितळादेवी, मरीमाता, शिवाईदेवी, पुराणिकांचे राममंदिर, रानवडे पाटलांचे दत्त मंदिर, शिंदे सरकारांचे विठ्ठल मंदिर, कुडूसकरांचे दत्त मंदिर, दाक्षिणात्यांचे कार्तिक स्वामी मंदिर, मलिंग बाबा पीर इ. महत्त्वाची देवस्थाने, औंध गावाने आणि ग्रामस्थांनी मोठय़ा श्रद्धेने जपली आहेत. तिथी माहात्म्यानुसार त्या त्या देवस्थानचे उत्सव, आजतागायत मोठय़ा श्रद्धेने साजरे होतात. गुढीपाडवा हा औंध गावाच्या दृष्टीने मोठा सण, त्याचबरोबर भैरवनाथाचा उरुस आणि त्या निमित्ताने रंगणारे तमाशाचे फड आणि कुस्तीच्या आखाडय़ांची परंपरा गावाने आजही जपली आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व गावकरी भैरवनाथ मंदिरात एकत्र उत्स्फूर्तपणे जमतात. येथून मिरवणुकीने सर्व जण महादेव मंदिराकडे जातात. देवदर्शनानंतर मंदिराच्या आवारात छोटय़ा खड्डय़ामध्ये बारा विडय़ाची पाने, धान्यासह आदल्या दिवशी पुरलेली असतात. ती सर्वासमक्ष खड्डय़ातून काढून दाखवली जातात. ज्या पानामध्ये अधिक दव असते, त्या महिन्यात, आगामी वर्षांत सर्वाधिक पावसाचे वर्तमान मानले जाते. स्मार्ट सिटीच्या परिघात आयटी कंपन्यांनी गजबजलेल्या औंध गावठाणात उच्चशिक्षित तरुणांच्या साक्षीने होणारे हे प्रकार गावपण जपणारे असेच वाटतात. तेथून सर्व गावकरी पुन्हा भैरवनाथाच्या मंदिरात जमतात. इथे गेल्या वर्षभरातील कार्याचा आणि आर्थिक ताळेबंदाचा आढावा घेतला जाते. जाहीर पंचांगवाचन होते. पारदर्शकतेने होणाऱ्या सर्व बाबींचे नियंत्रण हे पूर्वापार पद्धतीने आसमधनी मंडळी (परंपरागत मानकरी घराण्यांचे प्रतिनिधी) करतात. हा सर्व कारभार आणि न्यायनिवाडा, पंचायत पद्धतीने सर्वासमोरच होतो, हे विशेष! गावामध्ये सर्व धर्मपंथीयांचीसुद्धा धर्मस्थळे आहेत. शीख, जैन, ख्रिश्चन, मुस्लीम इ.चे सण, उत्सव इथे एकोप्याने साजरे होतात. औंध परिसरात असलेल्या शिक्षण संस्था आणि महत्त्वाचे उद्योग व्यवसाय यांचादेखील गावच्या विकासात आणि लौकिकात महत्त्वाचा सहभाग आहे. पुणे विद्यापीठ, औंध आयटीआय, वैकुंठ मेहता इन्स्टिटय़ूट, भारतरत्न डॉ. आंबेडकर महाविद्यालय तसेच रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय कार्यालय औंधमध्येच आहे. शिवाजी विद्यामंदिर ही शाळा जनता शिक्षण संस्थेच्या वतीने चालवली जाते. दयानंद अँग्लो वैदिक ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था परिसराचे भूषण आहे. भैरवनाथ मंदिराच्या पिछाडीस औंध गावची लाल मातीच्या हौदाची तालीम असून, मॅटवरील कुस्तीचे तसेच ज्यूदो, कराटेचेसुद्धा इथे शिक्षण दिले जाते. गावाच्या सरहद्दीवर, नदीपलीकडे, औंध चेस्ट हॉस्पिटल तसेच लष्करी वसाहती आहेत. हमरस्त्यावरून दिसणारी बॉडी गेट पोलीस चौकी आणि त्या मागील घोडय़ांची पागा, पोलीस वसाहत ही ठिकाणे ब्रिटिशकाळातील ऐतिहासिक ठेवा आहेत. नियोजनबद्धतेने आता त्यांचे स्थलांतर होत आहे. उच्चभ्रू कॉस्मोपॉलिटन मंडळींच्या हौसिंग सोसायटय़ा यासुद्धा औंधच्या विकासाच्या पाऊलखुणा आहेत. सिंध सोसायटी ही फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापित मंडळींची असून, सुरुवातीस इथे तंबू उभारले होते. नंतर कच्ची घरे आणि आता आलिशान बंगले असे बदलते स्वरूप आहे. नॅशनल, गुडवील, आनंद पार्क, मंगेश तसेच वायरलेस कॉलनी या वसाहती सुमारे १९८० नंतर वसल्या. अलीकडच्या काळातील कुमार क्लासिक या सोसायटीच्या जागी पूर्वी दगडाच्या खाणी आणि पाणथळ होती, असे समजले.
गावातील रूढी, परंपरा जपताना विकासाबरोबर नीतिमत्ता आणि धार्मिकतेचेही जतन व्हावे, गुणिजनांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने औंध गाव विश्वस्त मंडळ ही गावकऱ्यांची संस्था कार्यरत आहे. जीवित नदी या संस्थेमार्फत मुळा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याचे प्रयत्न पर्यावरणप्रेमी करीत आहेत. औंध गावाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला पावणेतीनशे वर्षांची परंपरा आहे असे उल्लेख वाचले. गावाचे वातावरण पवित्र ठेवण्यास भजनी मंडळाचे अनेक उपक्रम कारणीभूत आहेत. संगणक प्रशिक्षणासाठी औंध शिक्षण मंडळ कार्यरत आहे. या परिसराची भ्रमंती केल्यावर वीसपेक्षा अधिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स या परिसरात असल्याचे लक्षात आले.
गावठाणाचा विकास कशामुळे झाला आणि सद्य:स्थितीतील समस्या कोणत्या, याचा धावता परामर्श इथे उपयुक्त ठरतो. उत्तम हवामान, निसर्गसंपन्न परिसर, तुलनात्मक स्वस्त जमिनी आणि घरे, मंदिरे आणि शिक्षण संस्थांमुळे बहरलेल्या लोकवस्ती, कष्टकऱ्यांना खात्रीशीर रोजगार, सुरक्षित परिसर, शांतताप्रिय गावकरी, मुंबई-पुणे रस्त्याला जोडणारा दुवा, अशा अनेक कारणांनी औंधच्या विकासाची सद्य:स्थिती पाहायला मिळते. रानवडे, जुनवणे, गायकवाड, चोंधे अशा जमीनदार मंडळींनी, विविध संस्था, देवस्थाने यांना दान किंवा अल्पदरात दिलेल्या जमिनींचा विचारसुद्धा महत्त्वाचा आहे. समस्यांचा विचार करता गावठाणाच्या परिघावर स्मार्ट सिटीचा बहर आणि रखडलेली किंवा गतिरोधक असलेली विकासवाट हे परस्पर विरोधी चित्र मनामध्ये घर करून राहते.
औंध गावठाणाचा विचार करताना नामवंत बुजुर्ग मंडळी- खंडेराव रानवडे, यशवंतराव गायकवाड, बाबुराव रानवडे, बबनराव भगत, दत्तोबा रानवडे, चंद्रकांत गायकवाड, भैयासाहेब कलापुरे, मारुतराव गायकवाड, सखाराम रानवडे आदींचा उल्लेख महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्षे गावाच्या विकासकार्यात सहभागी असलेले दत्ताजी गायकवाड, तानाजी चोंधे, शहाजी रानवडे, वसंतराव जुनवणे, विकास रानवडे, निवृत्ती कलापुरे, बाळासाहेब रानवडे आणि लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे आहे.
ऋणनिर्देश- संदर्भ, औंधचा इतिहास (शहाजी रानवडे), डॉ. अविनाश इनामदार, गणेश कलापुरे, डॉ. अविनाश सोवनी, बाळासाहेब रानवडे.