कॉर्पोरेट सेवा, ग्रुप टूर, हनीमून टूर, साहसी आणि विलक्षण अनुभव देणाऱ्या सहल, क्रिकेट, कबड्डी आणि फुटबॉलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघाची वाहतूक सेवा, शाळा, महाविद्यालय, इंडस्ट्री व्हिजिट, अभ्यासदौरा, शैक्षणिक सहली अशा अनेक क्षेत्रात विश्वासार्ह आणि उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून गिरीकंद ट्रॅव्हल्स गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहे. पर्यटन म्हणजे केवळ चारधाम यात्रा अशी संकल्पना ते गो ऑन हॉलिडेअसा संकल्पनात्मक बदल गिरीकंदने केला आहे. भांडारकर रस्त्यावरील नव्वद चौरस फुटांच्या एका छोटय़ा खोलीतून सुरू झालेला गिरीकंदचा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. महाराष्ट्राची पर्यटन सेवा देणाऱ्या अधिकृत संस्थांची डायमंड पार्टनर असलेल्या गिरीकंदकडून अंटार्टिका ते महाबळेश्वर अशा जगभर सहली आयोजित केल्या जातात.

गिरीकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि. कंपनीची स्थापना १९७७ मध्ये विश्वास जोशी आणि शुभदा जोशी या दाम्पत्याने केली. भांडारकर रस्त्यावरील घरातच ९० चौरस फुटांच्या एका खोलीमध्ये गिरीकंदचे कार्यालय उभे केले आणि कामाला सुरुवात केली. व्यवसाय सुरू केला तेव्हा म्हणजेच चार दशकांपूर्वी पर्यटनाबरोबरच सर्वच क्षेत्राची प्रमाणित माहिती पुरेशी उपलब्ध नव्हती. मात्र, विश्वास यांना प्रवासाची आवड असल्याने आणि प्रवासाचा प्रचंड अनुभव असल्याने पर्यटन क्षेत्रातील वास्तवदर्शी माहिती विस्तृत स्वरूपात होती. त्यामुळे पर्यटनाचा व्यवसाय सुरू करण्याचे जोशी दाम्पत्याने ठरविले. त्या काळी केवळ यात्रा कंपन्या हा व्यवसाय करीत असत.

सामान्य लोक निवृत्तीनंतर काशी, रामेश्वर यात्रा करायचे. फिरायला जाणे म्हणजेच यात्रा, असे एक समीकरणच त्या काळी होते. अशा परिस्थितीत गिरीकंदच्या प्रवासाला सुरुवात झाली. यात्रा म्हणजेच पर्यटन असा एक रूढ समज असताना पर्यटन हा केंद्रबिंदू मानून पर्यटनाला चालना देणे हाच उद्देश समोर ठेवून व्यवसायाला सुरुवात केली. लग्नानंतर नव्या जोडप्याने देवदर्शनालाच नमस्कार करायला जायचे अशी पद्धत होती. हनीमून अशी संकल्पनाच तेव्हा अस्तित्वात नव्हती. काश्मीर, हिमाचल येथे केवळ फिरण्यासाठी जाऊ शकता, शाळेच्या सहली शहरातच काढल्या जात. अशा काळात शाळा, महाविद्यालयांच्या सहली, हनीमून सहल, केवळ आनंदासाठी किंवा बदल म्हणून सहली ही संकल्पना गिरीकंदने पुण्यात रुजवली.

भारतात पहिली निर्मिती झालेली निओप्लॅन ही बस १९८८ साली गिरीकंदकडे आली. अशाप्रकारे केवळ पर्यटनच नव्हे तर राज्यासह देशात आणि परदेशात होणाऱ्या स्थित्यंतराप्रमाणेच जोशी दाम्पत्याने व्यवसायात बदल केले आणि बदलत्या काळानुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार गिरीकंदचा दृष्टिकोन ठेवला. गिरीकंदच्या पहिल्या काही वर्षांतील प्रवासानंतर १९९० पासून पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे विस्तार झाला.

‘आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विकास होण्यासाठी परदेशाहून पर्यटक भारतात आणि महाराष्ट्रात येणे गरजेचे आहे. हे ओळखून त्याला चालना देण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच गिरीकंदने केला. महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना, कंपन्यांच्या प्रतिनिधींना, कॉर्पोरेट लोकांना गिरीकंद सेवा उपलब्ध करून देते. याबरोबरच देशात आणि महाराष्ट्रात होणारे क्रिकेट, कबड्डी, फुलबॉलच्या सामन्यांकरिता वाहतुकीसह सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. हेच गिरीकंदचे बलस्थान आहे,’ असे शुभदा सांगतात. शुभदा यांनी भारतातील ट्रॅव्हल एजंट असोसिएशन संस्थेमध्ये आठ वर्षे सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. २००५ पासून गिरीकंदच्या कामात विश्वास आणि शुभदा यांचे पुत्र अखिलेश यांनी हातभार लावण्यास सुरुवात केली आणि २०१५ पासून व्यवसायाचे संपूर्ण काम ते एकटे पाहत आहेत. गिरीकंदचा वाहतूक विभाग अखिलेश यांनीच उभा केला आहे. गिरीकंदच्या सध्या नऊ शाखांमध्ये ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्या ५० फ्रॅन्चायजी असून ४५० गाडय़ा आहेत. शाखा नऊच असल्या तरी देखील कंपनीच्या प्रतिनिधींचे जाळे मात्र, जगभर पसरले आहे.

ट्रॅव्हल्स आणि पर्यटनाबरोबरच पुणे कॉर्पोरेट सिटी म्हणून ओळखली जाऊ लागल्यानंतर अनेक परदेशी कॉर्पोरेट कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकारी वर्गाचे येणे-जाणे सुरू झाले. त्यांना विमानाचे तिकीट, वाहतूक व्यवस्था, त्या सगळ्या सेवा गिरीकंदने सुरू केल्या. पुण्यात येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना लागणाऱ्या कॉर्पोरेट सेवेची गरजही गिरीकंद पूर्ण करते. विमानाचे ई-तिकीट काढण्यासाठीचा पहिला संगणक आणि संगणकप्रणाली पुण्यात प्रथम गिरीकंदकडेच आली. महाराष्ट्र आणि भारत सरकारने गिरीकंदला ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, कार रेंटल ऑपरेटर म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात अशा मान्यता मिळालेल्या अत्यंत कमी एजन्सीमध्ये पहिला क्रमांक गिरीकंदचा आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचा गिरीकंद ‘डायमंड पार्टनर’ आहे. टूर ऑपरेटर, कार रेंटलमध्ये एक्सलन्सकरिता, जागतिक आणि एअरलाइन्सचे टॉप सेलर अशी अनेक पारितोषिकांनी गिरीकंदला गौरविले आहे. एका वर्षांत तब्बल ४० हजार पर्यटक गिरीकंदची सेवा घेतात. सामाजिक दायित्व म्हणून प्रिझम फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना आणि विशेष मुलांसाठी खास सहलींचे आयोजन दरवर्षी गिरीकंदकडून केले जाते.

‘परदेशात स्थायिक झालेले पालक आपल्या मुलांना भारत दाखविण्यासाठी गिरीकंदची निवड करतात. तसेच वीस किंवा त्याहूनही अधिक वर्षे सलग गिरीकंदची सेवा घेणारे ग्राहक आहेत. सर्वप्रथम हनीमूनला जाण्यासाठी गिरीकंदची निवड केलेल्या जोडप्यांची नातवंडे परदेशात हनीमूनसाठी गिरीकंदमार्फतच जातात असे ग्राहक कंपनीने जोडले आहेत. त्यामुळे व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, सातत्य, विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे. या व्यवसायात आगामी काळात प्रचंड बदल होणार आहेत. त्या बदलाला समोरे जाण्याची तयारी असेल, तरच यशस्वी होऊ शकता,’ असे शुभदा सांगतात. ‘आगामी काळात प्रवास सल्लागार उभे करायचे आहेत. जेणेकरून ते पर्यटकांना उत्तम मार्गदर्शन करू शकतील. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर जगाचा आवाका येण्यासाठी युवकांसाठी म्हणून खास युरोप सहली सुरू करायच्या आहेत. याबरोबरच हॉटेल व्यवसायामध्ये येण्याचा मानस आहे,’ असे अखिलेश यांनी सांगितले.