गेल्यावर्षीपेक्षा आवळय़ाचे उत्पादन चांगले
बहुगुणी आवळय़ाचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आवळय़ाची आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात आवळय़ाला प्रतिकिलो पंधरा ते पंचवीस रुपये भाव मिळाला आहे.
आयुर्वेदात आवळय़ाचे सेवन केल्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होत असल्याचे विशद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सामान्यांकडून आवळय़ाला मागणी वाढली आहे. घाऊक फळबाजारात राजस्थान, सातारा भागातून आवळय़ाची आवक सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या आवळय़ाच्या हंगामाची अखेर फेब्रुवारी महिन्यात होते. महाराष्ट्रात नाशिक जिल्हय़ातील मालेगाव, अहमदनगर जिल्हय़ातील कर्जत, राहुरी भागातील शेतकरी आवळय़ाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतात. नरेंद्र सेव्हन, चकाया, कृष्णा कांचन या आवळय़ाच्या प्रमुख जाती आहेत. आवळय़ाच्या अन्य जातींपेक्षा नरेंद्र सेव्हन या जातीच्या आवळय़ाला मोठी मागणी असते, अशी माहिती फळबाजारातील विक्रेते विलास निलंगे यांनी दिली.
सध्या बाजारात दोन ते तीन टन आवळय़ाची आवक होत आहे. नोव्हेंबर महिन्यात आवळय़ाची आवक वाढून ती दहा ते पंधरा टनांपर्यंत पोहोचेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवळय़ाचे उत्पादन चांगले झाले आहे. बाजारात दाखल झालेला आवळा रंगाने हिरवा, रसदार आणि आकाराने मोठा आहे. आवळा कँडी तयार करण्यासाठी लागणारा रेषा न निघणारा आवळा बाजारात दाखल होत आहे. यंदा आवळय़ाचे उत्पादन चांगले झाल्यामुळे भावात घट झाली आहे. गतवर्षी प्रतिकिलो आवळय़ाला तीस ते पस्तीस रुपये असा भाव मिळाला होता.