पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) मोठ्या प्रमाणात विदा लागतो. संशोधनासाठी आता ‘एआय’चा वापर केला जात आहे. तसेच जगभरातील संशोधनाच्या विदाच्या आधारे ‘एआय’ची प्रारूपे प्रशिक्षित केली जात आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रत्यक्ष प्रयोगांची गरज कमी होऊन संशोधनाच्या खर्चात घट होऊ शकेल, असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) महासंचालक डॉ. एन. कलाईसेल्वी यांनी मांडले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित शास्त्रज्ञ गोलमेज परिषदेसाठी त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सीएसआयआर’कडून हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम आणि नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्यात येत आहे. हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसह (एनसीएल) किमान सहा प्रयोगशाळा एकत्रित काम करत आहेत. या मिशनअंतर्गत उद्योग क्षेत्रातील थरमॅक्स, केपीआयटी, रिलायन्स अशा कंपन्यांच्या सहकार्याने हायड्रोजन निर्मिती, वापर आणि साठवणीसाठीच्या तंत्रज्ञान विकसनावर भर देण्यात येत आहे.
हायड्रोजनवर चालणारी बस, बोट यांची चाचणीही करण्यात आली आहे. हायड्रोजनचा इंधन म्हणून वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. मात्र, सध्या हायड्रोजनसाठी प्रति किलो तीन डॉलर खर्च येत असल्याने तो व्यापक प्रमाणात वापरासाठी परवडणारा नाही. त्यामुळे हायड्रोजनची किंमत प्रति किलो एक डॉलरपर्यंत कमी झाल्यावरच त्याचा सार्वजनिकरीत्या वापर शक्य होईल. त्यामुळे सध्या दर कमी करण्यासाठीचे संशोधन सुरू आहे.
ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्यात येत आहे. ‘एआय रास्ते’ या प्रकल्पात नागपूर येथे वाहतूक व्यवस्थापनासाठी एआय आधारित निर्णय प्रणाली वापरण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यास मदत झाली आहे. तेलंगणा सरकारने हा प्रकल्प स्वीकारला असून, आता तो इतर राज्यांमध्येही वापरण्यात येणार आहे. दिल्लीतील रस्ते संशोधन संस्था (सीआरआरआय) या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे, असे डॉ. कलाईसेल्वी यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांच्या नवउद्यमींना प्रोत्साहन
शास्त्रज्ञांच्या नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना विविध योजनांअंतर्गत अर्थसाहाय्य उपलब्ध होते. त्यानुसार आतापर्यंत काही शास्त्रज्ञांनी त्यांची नवउद्यमी विकसित केली आहे, असेही डॉ. कलाईसेल्वी यांनी सांगितले.