पुणे : गेल्या काही काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग अशा क्षेत्रांच्या वाढत्या प्रभावाचा अभियांत्रिकी पदवी प्रवेशावरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकी पदवी प्रवेशात पुणे विभागात यंदा प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या असून, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग अशा संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने या अभ्यासक्रमांसाठी सुमारे ३० हजार जागा आहेत.

राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५मध्ये पुणे विभागात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ६४ हजार ९८ जागा होत्या. तर, यंदा २०२५-२६मध्ये प्रवेशासाठीच्या जागांमध्ये वाढ होऊन ७१ हजार ३२० जागा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांसह संगणक, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक नवे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यात संगणकशास्त्र, मशिन लर्निंग, विदा विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, उपकरण अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, आयओटी, ऑटोमेशन अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे म्हणाले, ‘विदा विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग अशा क्षेत्रांत नोकऱ्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, संगणकसंबंधित अभ्यासक्रमांना आहे. मात्र, त्या बरोबरीनेच आता मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य अभियांत्रिकी अशा मूलभूत शाखांतील अभ्यासक्रमांचाही प्रतिसाद वाढतो आहे. त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पात्रता गुण वाढत आहेत.’

‘येत्या काही काळात संगणक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी स्थिर होण्याची चिन्हे आहेत. तर, उत्पादन क्षेत्रात मनुष्यबळाची मागणी वाढू शकते. त्यामुळे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य अशा क्षेत्रांत संधी निर्माण होऊ शकतात,’ असे निरीक्षण महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी नोंदवले.

गेल्या काही काळात संगणकशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये जास्त संधी आहेत, प्लेसमेंट होत आहेत, पॅकेज मिळत आहेत, असे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्या अभ्यासक्रमांकडे ओढा आहे. स्वाभाविकपणे पुणे विभागांतर्गत असलेल्या शिक्षण संस्थांनीही त्या अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ केली आहे. – डॉ. दत्तात्रय जाधव, पुणे विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय