पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची परतवारी शुक्रवारी (१८ जुलै) पुण्यात येत आहे. दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम असून, शनिवारी (१९ जुलै) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूकडे आणि रविवारी (२० जुलै) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीकडे मार्गक्रमण करणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतवारीला शुक्रवारी सकाळी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे येणार आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पाच वाजता मुक्कामी येणार आहे. माउलींची पालखी रविवारी (२० जुलै) सकाळी दहा वाजता आळंदीकडे मार्गक्रमण करणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी (१९ जुलै) सकाळी सात वाजता देहूकडे जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. परतवारीच्या पालखी मुक्कामातील वारकऱ्यांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मंदिरांमध्ये कीर्तन आणि हरिनामाचा जागर होणार आहे.
परतवारी म्हणजे काय?
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी द्वादशीला पारणे सोडतात. पालखी सोहळ्याबरोबर पोहोचलेल्या सगळ्या दिंड्या, वारकरी आपापल्या गावी जाण्यास निघतात. गुरुपौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर पालखी सोहळा परत आपापल्या मुक्कामी जाण्यास निघताे. या परतीच्या प्रवासाला ‘परतवारी’ असे म्हणतात. परतवारीचा मार्ग तोच असला, तरी मुक्काम कमी असतात. काही मुक्कामाची ठिकाणे, गावेही वेगळी असतात आणि परतवारीचा वेग जातानाच्या वारीच्या वेगापेक्षा अधिक असतो.