पुणे : तंत्रज्ञान विकास संशोधनाकरिता संशोधन संस्था सुरू करण्याचा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’चा प्रस्ताव मान्य करत असल्याचे राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी जाहीर केले.‘एमकेसीएल’च्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ही संशोधन संस्था सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार माहिती तंत्रज्ञान खात्याला मदत करतील,’ असेही ते म्हणाले.
‘राज्याला आता ई-गव्हर्नन्सकडून एआय-गव्हर्नन्सकडे जायचे आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ने केवळ सहभागी न होता सहप्रवासी म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर काम करावे आणि शोधप्रबंधरूपी पथदर्शी आराखडाही तयार करून द्यावा. सध्याच्या काळात डिजिटल साक्षरतेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षणही गरजेचे आहे. ही दोन्ही कौशल्ये कशी निर्माण करायची, हे ‘एमकेसीएल’ला माहीत असल्याने त्यांनी आमचे भागीदार व्हावे,’ असे आवाहन शेलार यांनी केले.
संशोधनाची गरज अधोरेखित करताना ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत म्हणाले, ‘कम्प्युटिंगमध्ये नवनवी क्षेत्रे उदयास येत आहेत. डिजिटल कम्प्युटिंग मागे पडून ॲनालॉग, ऑप्टिकल, स्टोकॅस्टिक, न्यूरोमॉर्फिक असे करत करत कम्प्युटिंगचा प्रवास क्वांटम कम्प्युटिंगपर्यंत होत आहे. या सगळ्या शाखांचा समाजासाठी खूप उपयोग होणार असून, या शाखांतील जागतिक दर्जाचे संशोधन करण्यासाठी, तसेच क्वांटम कम्प्युटिंगमधील अनेक शक्यता लक्षात घेता, त्यात महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यासाठी संशोधन विद्यापीठ विकसित करणे गरजेचे आहे. केंद्रीय स्तरावर घोषणा झालेल्या राष्ट्रीय संशोधन संस्थेसाठीच्या एक लाख कोटी रुपयांच्या निधीतून काही निधी यासाठी महाराष्ट्रात आणता येईल.’
‘जगाची संपर्कभाषा इंग्रजी होती, आता त्याची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता या संपर्क तंत्रज्ञानाने घेतली आहे. आपली भाषा टिकवून जगाशी व्यवहार करणे यामुळे शक्य आहे. त्यामुळे अनेक भाषा शिकत बसण्याची गरज नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा सक्षम व्हावी,’ अशी अपेक्षा विवेक सावंत यांनी आशिष शेलार यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर, ‘जगात मराठी पोहोचविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या आयुधाचा वापर करणाऱ्या एमकेसीएलला मदत करू,’ असे आश्वासन शेलार यांनी दिले.
देश अग्रेसर होण्यासाठी इतरांची कॉपी उपयोगाची नाही. आपल्या कल्पनांनुसार पुढे जाण्याची धमक हवी. त्याचबरोबर ‘जीडीपी’ वाढला, तरी आर्थिक आणि डिजिटल विषमता कायम राहून चालणार नाही. त्यामुळे त्यासाठी तळागाळातील युवक एआयसक्षम होणे गरजेचे आहे.– डॉ. अनिल काकोडकर,ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष, एमकेसीएल