पुणे : दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

शकील मोहम्मद शेख ‌(वय ४५, रा. लोणावळा) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शकील शेख पुणे ग्रामीण पोलीस दलात नियुक्तीस आहेत. त्यांची नेमणूक लोणावळा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नारायणीधाम पोलीस चौकीत करण्यात आली होती.

या प्रकरणातील ४२ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी शकील शेख यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी सापळा लावून शेख यांना तडजोडीत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील,अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त भारती मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.