पुणे : आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) आणि टोकियो विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी एका अत्यंत असामान्य दीर्घिकेभोवती एका विलक्षण दीर्घिकीय वाऱ्याचा प्रकार टिपला आहे.

पृथ्वीपासून १७ कोटी प्रकाश वर्षे दूर असलेल्या, ७ हजार १०० प्रकाश वर्षांचा व्यास असलेल्या, मोठ्या प्रमाणावर नवीन तारे निर्माण करत असलेल्या जे १०४४ ०३५४ या दीर्घिकेभोवती सात प्रचंड बुडबुडे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, या बुडबुड्यांचा व्यास २३ हजार प्रकाश वर्षे म्हणजे, पृथ्वीपासून आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागी असलेल्या कृष्णविवराइतकाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुकाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या संशोधनाची माहिती दिली. आयुकातील डॉ. एडमंड ख्रिश्चन हेरेन्झ, सौमिल मौलिक, टोकियो विद्यापीठातील हारुका कौसाकाबे यांचा या संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ जपान’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. पृथ्वीच्या सूर्यापेक्षा २५ ते १०० पट अधिक मोठ्या वस्तुमानाचे तारे फार काळ टिकत नाहीत. सुमारे तीन ते पाच दशलक्ष वर्षांनंतर त्यांचा स्फोट (सुपरनोव्हा) होऊन अफाट प्रमाणात पदार्थ अवकाशात फेकले जातात. पृथ्वीच्या आकाशगंगेतील (मिल्की वे) अशा सुपरनोव्हा स्फोटांची सरासरी वारंवारता सुमारे एका शतकात तीन वेळा असते.

पृथ्वीच्या आकाशगंगेचे वस्तुमान आणि आकारमान खूप मोठे असल्यामुळे या स्फोटांचा एकूण आंतरतारकीय वायूंच्या वितरणावर फारसा प्रभाव पडत नाही. मात्र, पृथ्वीच्या आकाशगंगेच्या तुलनेत दहा हजार पट कमी वस्तुमान असलेल्या दीर्घिकांमध्ये असाच सुपरनोव्हा स्फोटाचा दर अत्यंत परिणामकारक ठरतो. ताऱ्यांच्या स्फोटांमधून निघणारा उच्च वेगाचा वायू टिकू शकत नाही इतके अशा दीर्घिकांमध्ये गुरुत्वाकर्षण बल कमी असते. त्यामुळे उच्च वेगाचा वायू त्या दीर्घिकेबाहेर ‘गॅलॅक्टिक विंड’ किंवा दीर्घिकीय वारा म्हणून फेकला जातो. या वाऱ्यातील पदार्थ अत्यंत विरळ असल्याने त्याची प्रतिमा मिळवणे अत्याधुनिक दुर्बिणींसाठीही अवघड असते.

या पार्श्वभूमीवर, लहान दीर्घिकांच्या आजूबाजूला दीर्घिकीय वाऱ्यांमुळे तयार झालेले बुडबुडे गेल्या दोन दशकांपासून माहीत आहेत. मात्र, नव्याने आढळलेले बुडबुडे यापूर्वी पाहिल्या गेलेल्या बुडबुड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मोठे आहेत. त्यामुळे विश्वातील दीर्घिकांची निर्मिती, उत्क्रांती समजून घेण्यासाठी दीर्घिकीय वाऱ्याची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. मात्र, हे वारे नेमके कसे कार्य करतात, हे नीट समजून घेण्यासाठी अनेक लहान दीर्घिकांभोवतीच्या विरळ वायूंचे प्रत्यक्ष चित्रण करावे लागणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.