पुणे : ‘कोणतीही भाषा ही कर्तृत्ववान माणसांमुळे वाढत असते. मराठ्यांच्या पराक्रमी कर्तृत्वाने मराठी भाषा बहुमुखी झाली. माणसाच्या जगण्याशी भाषेचा संबंध जोडता आला पाहिजे. सध्याचा काळ असा आहे की माणसांची जगण्याची धडपड सुरू आहे. जगण्याची शाश्वती आल्यानंतरच माणूस भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करू शकेल. केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने नाही तर, विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचे क्षितिज विस्तारले तर भाषा विकसित होईल’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
‘पुणे बुक फेअर’मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधला. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, पी. एन. आर. राजन आणि शिरीष चिटणीस या वेळी उपस्थित होते.
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व आहेच. पण, सध्या समाज माध्यमांमुळे अभिव्यक्तीचा महापूर आला. त्यामुळे चांगले काय घ्यावे हा प्रश्न उपस्थित झाला. अतिअभिव्यक्तीचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे लेखक आणि लिहिणारे यात फरक राहिला नाही’, याकडे मोरे यांनी लक्ष वेधले. ‘कीर्तनातून विनोद सांगू नये असे माझे मत आहे. कीर्तनकार समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करतात. पण, त्यांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. आता कीर्तनामध्ये अभंग केवळ खुंटीपुरता उरतो. कीर्तनकाराने केवळ प्रश्न मांडता कामा नये. तर, त्या प्रश्नाचे परमार्थाच्या चौकटीत उत्तर कीर्तनकाराला देता आले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
‘राजकारणाबाहेर राहून मी जे लेखन कार्य केले ते कोणी केले असते? त्यामुळे राजकारणात नसल्याने काही फरक पडला नाही. याचे कारण माझी जागा घ्यायला अनेकजण होते. साहित्यामध्ये माझी जागा कोणी घेतली असती?,’ असा प्रतिप्रश्न मोरे यांनी ‘सध्याच्या काळातील राजकारण पाहता तेथे नाही याचे समाधान वाटते का?’ या विषयावर बोलताना केला.
दरवाजे उघडतच नाही
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञानामुळे माणसांच्या नोकऱ्या राहतील का, अशी परिस्थिती होणार आहे. जातीच्या आधारावर आरक्षणासाठी आपण भांडणार असून तर, मग नोकरी द्यायची कोणाला? हा पुढचा प्रश्न आहे. आपण घरातच मारामाऱ्या करतो आहोत. अनेक प्रश्न दारात येऊन ठेपले आहेत. पण, आपण दरवाजे उघडत नाही, हे वास्तव आहे’, याकडे डाॅ. सदानंद मोरे यांनी लक्ष वेधले.
जातीच्या आधारे राजकारण करता येते हा विचार आज समाजात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. रोटी-बेटीच नव्हे तर मतदान पेटीतील व्यवहारातही जातीपाती आणि धर्माचे प्रस्थ आहे. याला राजकारणीच जबाबदार आहेत. जातीच्या आधारे राजकारण करण्याचा शॉर्टकट स्वीकारला जात आहे. – डाॅ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक
