पुणे : शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मागील महिन्याभरापासून विरोधी पक्षासह अन्य संघटनामार्फत निषेध नोंदविला जात आहे. महायुती सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन्ही पक्षाकडून ५ जुलै २०२५ रोजी एकत्रित मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चावरून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
त्याच दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे पुणे जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ती पत्रकार परिषद सुरू असताना, अशोक उईके यांनी हिंदी भाषेबद्दल वक्तव्य केलं आहे.
” मला हिंदी येत नाही. मी हिंदी बोलणार नाही आणि बाइट देखील देणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार ” असे उईके यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावेळी उपस्थित पत्रकारानी विचारले की, हिंदी भाषेला विरोध म्हणून का? त्यावर ते म्हणाले, विरोध वैगरे नाही, माझ जन्म आदिवासी भागात झाला आणि माझी आई अशिक्षित होती. आईने मराठी भाषेचे संस्कार केले. त्यामुळे तीच भाषा मला येत असल्याचे त्यांनी सांगितले.