राष्ट्रवादी चे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं भासवून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपरी- चिंचवड च्या चिखली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवदास साधू चिलवंत यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली आहे. चिलवंत हे मेट्रो च्या खासगी सुरक्षा एजन्सीचे व्यवस्थापक आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणाची चौकशी करावी हा प्रकार माझ्या कार्यालयाशी निगडित नाही अस त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा >>> पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा फोन तक्रारदार शिवदास साधू चिलवंत यांना आला. मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतो आहे. तुम्ही उस्मानाबाद येथील आहात. असे म्हणून पैश्यांची मागणी केली. त्यानंतर, चिलवंत यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. घाबरलेल्या चिलवंत यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. चिलवंत यांच्यासोबत कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा संशय पोलिसांना आहे.  या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पिंपरी- चिंचवड आणि पुणे पोलिसांना केली आहे. ट्विटद्वारे ते म्हणाले आहेत की, पुण्यात माझ्या कार्यालयाशी संबंधित असल्याचे सांगून एका अज्ञात व्यक्तीने एका व्यक्तीस पैशांची मागणी केल्याचा प्रकार समजला. असा कोणताही व्यक्ती माझ्या कार्यालयाशी संबंधित नाही. मी पुणे आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांना आवाहन करतो की या प्रकरणाचा तपास करून संबंधितावर योग्य कार्यवाही करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.